भावार्थ दासबोध -भाग १४७

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक दहा समास सहा भ्रम निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. सगळे खोटे म्हणून बोलतो आणि सिद्धी मिळण्याची आशा वाटते याचे नाव भ्रम.वैभवाकडे मन आसक्त झाले,कर्मठपणामुळे ज्ञानाचा वीट वाटला, जाणकार झाला, मोठा झाला त्यामुळे बळ भ्रष्ट झाले, सीमा ओलांडल्या याचे नाव भ्रम.देहाभिमान,कर्माभिमान, जातीचा अभिमान, कुळाचा अभिमान, ज्ञानाचा अभिमान, मोक्षाचा अभिमान याचे नाव भ्रम. न्याय कसा तो कळत नाही, केलेला अन्याय कळत नाही, उगाच अभिमानाने खवळतो याचे नाव भ्रम. मागील काही आठवत नाही,

पुढील विचार सुचत नाही, कायम काहीतरी अंदाज करत बसायचं याचे नाव भ्रम. अनुभव नसताना औषध घेणे, अनुभव नसताना पथ्य करणे, अनुभव नसताना ज्ञान सांगणे याचे नाव भ्रम. फलश्रुती नसताना प्रयोग करणे, ज्ञान नसताना नुसता योग करणे, उगाच शरीराने भोग भोगणे याचे नाव भ्रम. ब्रह्मदेव प्रारब्ध लिहितो आणि सटवाई वाचून जाते अशा प्रकारची गोष्टी म्हणजे भ्रम. उदंड भ्रम विस्तारला, लोकांमध्ये अज्ञान पसरवलं, मात्र कळावे म्हणून उदाहरणादाखल, माहिती व्हावं म्हणून मी थोडंस सांगितले.

विश्व हेच भ्रमरूप आहे तिथे मी काय सांगावे? निर्गुण ब्रह्म सोडले तर सगळे भ्रमरुप आहे. ज्ञात्याला संसार नाही असे सांगितले जाते पण गेलेल्या जाणकारांचे चमत्कार सांगतात याचे नाव भ्रम. इथे शंका उपस्थित झाली. ज्ञानी माणसाच्या समाधीचे पूजन केले तिथे काही प्रचिती आली किंवा नाही तसेच अवतारी संपले त्यांचे सामर्थ्य उदंड चालले तरी ते काय वाचनावरून गुंतलेले आहेत का अशी शंका उगवली आहे. तिचे निरसन समर्थांनी केले पाहिजे. असं समर्थ सांगतात आणि भ्रमाची कथा इथे समाप्त झाली आहे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे भ्रम निरूपण नाम समास षष्ठ समाप्त.

समास सातवा सगुण भजन निरूपण नाम समास 
जय जय रघुवीर समर्थ. अवतारी आणि ज्ञानी संत सारासार विचार करून मुक्त झाले त्यांचे सामर्थ्य कोणत्या प्रकारे चालते? ही श्रोत्याची शंका आहे. हा प्रश्न योग्य केलेला आहे त्याचे उत्तर देतो ते सावध होऊन ऐका असं वक्ता म्हणतो. ज्ञानी मुक्त होऊन गेले तरी त्यांचे सामर्थ्य चालत राहिले परंतु ते वासना धरून आलेले नाहीत. लोकांना तो चमत्कार वाटतो, लोक तसे मानतात परंतु याचा विचार करायला हवा. लोकांमध्ये चमत्कार होतात त्याची सत्य प्रचिती पाहिली पाहिजे. आपण केला नाही,लोकांनी प्रत्यक्ष पाहिल्या असा चमत्कार झाला, याला काय म्हणायचं? तरी हा लोकांचा भावार्थ आहे. भाविकांसाठी देव यथार्थ आहे. तिथे दुसरी कुतर्काची कल्पना व्यर्थ आहे.

आवडते ते सपना मध्ये पाहिले तरी काही तिथून आलं का? म्हणाल तसं आठवलं तरी द्रव्य तिथे दिसतं का? ही एक आपली कल्पना. स्वप्नामध्ये विविध पदार्थ येतात पण ते पदार्थ व्यवहारांमध्ये उपयोगी पडत नाहीत किंवा आठवत नाहीत त्यामुळे ही शंका कुठे उरली? ज्ञात्याला जन्म असल्याची कल्पना करू नका. समजत नसेल तर थोडा तरी विचार करून पहा. ज्ञानी लोक मुक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ्य उगीच चालते का? पुण्यमार्गावर चालल्यामुळे त्यांचे सामर्थ्य चालते. त्यासाठी पुण्य मार्गावर चालावं.

देवाचे भजन वाढवावे. न्याय सोडून  अन्याय मार्गाला जाऊ नये. नाना पुरश्चरण करावी, नाना तीर्थाटणे फिरावी, नाना सामर्थ्य वैराग्य बळाने वाढवाव, सामर्थ्याची इच्छा असल्यास आपल्या ब्रह्मत्त्वाचा निश्चय झाल्यानेही ते मिळू शकते. सामर्थ्यप्राप्तीने मात्र ब्रह्मप्राप्ती होणार नाही म्हणून शूद्र सामर्थ्याच्या पाठीमागे लागून ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असा एकांत कोणी भंगू देऊ नये. एक गुरु एक देव असा भाव असावा. हा भाव नसेल तर सगळे व्यर्थ आहे. निर्गुणाचे ज्ञान झाले म्हणून सगुणाकडे लक्ष दिले नाही तरी ते ज्ञाते दोन्ही बाजूकडून नागवले जातील. भक्ती नाही, ज्ञान नाही आणि मध्येच अभिमान वाढला, तसं होऊ नये म्हणून जप व ध्यान सोडू नये. असा सल्ला समर्थ देत आहेत.  पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.