भावार्थ दासबोध – भाग १५३

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक अकरा समास एक सिद्धांत निरूपण नाम समास 
जयजय रघुवीर समर्थ. सृष्टीच्या उभारणीची माहिती दिल्यानंतर आता संहाराची माहिती ऐका. मागच्या दशकामध्ये ती विशद करून दिलेली आहे, पण पुन्हा थोडक्यात माहिती देतो ती श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी. शंभर वर्षे पाऊस न झाल्यास जीवसृष्टी नाहीशी होईल, अशा कल्पान्ताच्या गोष्टी शास्त्रामध्ये सांगितल्या आहेत. बारा वर्षे सूर्य तापत राहिला तर त्यामुळे पृथ्वीची राख होईल. मग ती राख पाण्यामध्ये विरघळून जाईल. ते पाणी अग्नी शोषून घेईल. मग वारा तिथे येईल आणि तो निराकारामध्ये विलीन होईल. अशा तऱ्हेने सृष्टीची संहारणी झाली,

मागे विस्तारपूर्वक सांगितली आहेच. मायेचा निरास झाल्यामुळे स्वरूपस्थितीच उरली. तिथे जीव-शिव, पिंड-ब्रम्हांड हे सगळे थोतांड आटून गेले. माया अविद्येचे बंड वितळून गेले. विवेक प्रलय ज्याला म्हणतात तसा झाला पण विवेकी लोक जे सांगतात ते मूर्खांना कळत नाही. सगळी सृष्टी शोधली असता एक चंचल एक निश्चल, चंचलाचा करता चंचल असतो तो सगळ्या शरीरामध्ये वास करतो. सगळ्या कर्तृत्वास चालना देतो, म्हणून करून अकर्ता या शब्दात वर्णन करतात. राव रंक ब्रह्मादीक सगळ्यांमध्ये तो एकच आहे. तो नाना शरीरे इंद्रियांच्याद्वारे तो चालवतो. त्याला परमात्मा म्हणतात, सकल कर्ता असं जाणतात पण नसेल. त्याची प्रचिती विवेकाने घ्यावी.जो श्वानामध्ये गुरगुरतो, डुकरामध्ये कुरकुरतो, गाढवामध्ये मोठ्याने भुंकतो. लोक नाना देह पाहतात, विवेकी लोक देहातील आत्म्याला पाहतात, पंडित लोक अशाप्रकारे दोन्ही गोष्टी पाहतात. ‘विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवी हस्तानि शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः  देह वेगवेगळे आहेत पण सर्व प्राणिमात्रांच्या आतमध्ये जाणीव एकच आहे. तिला जगज्ज्योती, जाणती कळा असं म्हणतात. कानाद्वारे नाना शब्द जाणता येतात, त्वचेला शीत उष्ण समजते, डोळ्यांद्वारे पाहिले जाते.

जिभेद्वारे चव समजते, नाकाद्वारे वास घेतला जातो, कर्म इंद्रियांद्वारे नाना विषयांचा आस्वाद घेतला जातो. सूक्ष्मरूपाने स्थूल गोष्टींची नाना सुखदुःखाची परीक्षा केली जाते त्याला अंतरसाक्षी अंतरात्मा असे म्हणतात. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सुक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, दृष्टा, साक्षी हा सत्तारूप आहे. जो विकारातील विकारी आहे अखंड नाना विकार करतो त्याला  परम हीन भिकारी असे म्हणतात. सर्व एकच दिसत, सर्व एकच समजतात, ही चंचलातील मायिक स्थिती आहे.  माया ही चंचल मायिक आहे, परब्रम्ह हे एकमेव निश्चल आहे, हे नित्य-अनित्य  जाणणे हा विवेक आहे. जाणारा जीव म्हणजे प्राण, स्वरूप जाणत नाही तो अज्ञानी, जन्मणारा जीव तो वासनात्मक आहे असे जाण.  स्वरूपी ज्याचे ऐक्य झाले तो ब्रह्मांश, तिथे पिंड ब्रम्हांड यांचा निरास झाला आहे. इथे चत्वार जीवांचे विशेष सांगितले आहे. असो, हे सगळे चंचल आहे. चंचल सगळे जाईल आणि निश्चल आदिअंती राहील.

आद्य मध्य अवसान झाले तरी वस्तू सारखीच निर्विकारी, निर्गुण, निरंजन आणि निःप्रपंच राहील. उपाधीचा निरास झाला की जीव-शिवाचे ऐक्य होते, विचार केला तर उपाधी आहेच कुठे! जाणणे म्हणजे ज्ञान, आहे परंतु ज्ञानाचे अनुभवात रूपांतर झाल्यावर मग त्याचं विज्ञान होतं. मन उन्मन कसे होते ते ओळखावे. वृत्तीला निवृत्ती कळत नसेल तर गुणांना निर्गुण प्राप्ती कशी होईल? संतांमुळे विवेकद्वारे गुणातीत साधक झाले.  श्रवणापेक्षा मनन चांगले. मननामुळे सारासार समजते. निजध्यासाने साक्षात्कार होतो आणि निस्संग वस्तु समजते. निर्गुणांमध्ये असलेली अनन्यता म्हणजेच भक्ती.  आता लक्ष्यांश, वाच्यांश आता पुरे झाला. अलक्षाकडे लक्ष राहिले, मग सिद्धांतामध्ये पूर्वपक्ष कसा राहील? इतरांना प्रत्यक्ष आहे अशी वाटणारी माया जो अप्रत्यक्ष साक्षात्कारी झाला त्याल कशी दिसणार? त्याला ती निरर्थकच होय. माईक उपाधी असूनही सहज समाधी ज्ञानी माणसाला प्राप्त होते. श्रवणाद्वारे ही बुद्धी अशाप्रकारे निश्चयात्मक व्हावी ही अपेक्षा समर्थ करीत आहेत. आणि हा भागही इथे समाप्त झाला. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास प्रथम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.