भावार्थ दासबोध -भाग ९६

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक ७ समास ५ द्वैत कल्पना निरसन
जय जय रघुवीर समर्थ.ज्याप्रमाणे हरणाच्या सहाय्याने हरिण सापडते किंवा बाणामुळे बाण शोधला जातो, त्याप्रमाणे कल्पनेने कल्पना उडून जाते. शुद्ध कल्पनेचे बळ असेल तर सहजपणे अशुद्ध असलेले अज्ञान नाहीसे होते, याची माहिती आपण सावधपणाने ऐकावी. शुद्ध कल्पनेची खूण म्हणजे स्वतः निर्गुणाची कल्पना करणे त्यामुळे स्वस्वरूपाचे विस्मरण पण होतच नाही. नेहमी स्वरूपाशी जोडलेले राहिल्यावर द्वैताचे निरसन होते. अद्वय निश्चयाचे ज्ञान म्हणजे शुद्ध कल्पना. अद्वैत ही शुद्ध कल्पना आहे तर द्वैत ही अशुद्ध कल्पना आहे.

अशुद्ध हे प्रबळ आहे. शुद्ध कल्पनेचा अर्थ हाच अद्वैताचा निश्चित अर्थ आहे तसेच अशुद्ध कल्पना व्यर्थ आहे. अद्वैताची कल्पना प्रकाशते त्याचक्षणी द्वैताचा नाश होतो ते झाल्यावर अशुद्ध कल्पना देखील नाश पावते. शुद्ध कल्पनेने अशुद्ध कल्पना सरते आणि नंतर शुद्ध उरते. शुद्ध कल्पनेचे रूपच स्वरूपाची कल्पना करते, ते कल्पिले आत्ता आपण तद्रूप होतो. कल्पनेला खोटेपणा येतो, सहजपणे तद्रूपता येते, आत्मनिश्चयामुळे कल्पना नष्ट पावली. ज्या क्षणी निश्चय कमी पडतो त्याक्षणी द्वैत उफाळून येते.

संध्याकाळी सूर्य मावळल्यावर अंधकार होतो, त्याप्रमाणे ज्ञान मलीन झाले असता अज्ञान प्रबळ होते. तसे होऊ नये म्हणून अखंड श्रवण केले पाहिजे. आता हे बोलणं झालं, एका शब्दाने मी आपली शंका दूर करतो, मनाला द्वैत कळते ते तुझे स्वरूप नव्हे. मागच्या सगळ्या शंका फिटल्या त्यामुळे ही कथा संपली. आता श्रोत्यांनी पुढील कथा ऐकण्यासाठी सावधान व्हावे. इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वैतकल्पना निरसन नाम समास पंचम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

दशक सातवे समास सहावा बध्द-मुक्त निरूपण
जय जय रघुवीर समर्थ. कल्पने विरहित असलेल्या अद्वैत ब्रह्माचे निरूपण केले या निरुपणामुळे क्षणात तदाकार झालो. तर मी तदाकार व्हावे ब्रह्मच होऊन असावे, चंचलपणाने पुन्हा संसारात येऊ नये. कल्पनारहित असं चे सुख आहे तिथे संसाराचे दुःख नाही, म्हणून तेच एक होऊन असावे. ऐकून ब्रह्म व्हावे म्हणजे पुन्हा वृत्ती नको. नेहमी येणे जाणे जन्म मरण चुकले पाहिजे. मनाने आत शोध घ्यावा आणि क्षणात ब्रह्म व्हावे पुन्हा तिथून नेहमीच्या स्थितीवर यायचे. एखाद्या किटकाच्या पायाला दोरा बांधल्या प्रमाणे सारखी ये जा करणे, पुन्हा पुन्हा जन्म घेणे कुठवर चालणार?

उपदेशकाळी शरीर तदाकार झाले की मरण यायला हवे किंवा आपले, दुसऱ्याचे समजेनासे झाले पाहिजे. असे झाले नाही तर ते लाजिरवाणे वाटते. ब्रह्म होऊन संसार करणे विपरीत दिसते. जो स्वतः ब्रह्म झाला तो पुन्हा परत कसा आला हे ज्ञान मला काही प्रशस्त वाटत नाही, ब्रह्म होऊन जावे मग संसारात का बर असावे? दोन्हीकडे कशासाठी घोटाळावे? निरूपणामुळे ज्ञान प्रबळ होते आणि उठून गेलो ते नष्ट होते पुन्हा कामक्रोध खवळतात. असं कसं ब्रम्ह? दोन्हीकडे काहीच मिळत नाही आणि ओढाताण होऊन त्याचा संसार गेला. ब्रम्हसुखाची गोडी घेतल्यावर संसार पुन्हा मागे ओढतो आणि संसार आवडीने करू लागल्यावर पुन्हा ब्रह्म बोलावते.

संसाराने ब्रह्मसुख नेले आणि ज्ञानामुळे संसार गेला,दोन्ही अपूर्ण राहिले, एकही पूर्ण नाही झालं त्यामुळे माझे चित्त चंचल झाले आहे. काही निश्चित नसल्यामुळे मी दुःखी झालो आहे, असा प्रश्न श्रोत्याने विचारला. आता काय करू, माझी मती अखंड ब्रम्हासारखी होत नाही. या प्रश्नाचे सुंदर उत्तर वक्ता देईल,त्यामुळे श्रोता निरुत्तर होईल. कसे ते पुढील कथेमध्ये ऐका.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!