दशक ७ समास ६ बद्धमुक्त निरूपण
जय जय रघुवीर समर्थ. श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता की, संसार आणि ब्रम्ह यांच्यामध्ये जीवाची ओढाताण होते! त्याचे उत्तर समर्थ देत आहेत. जे ब्रह्म झाले ते मुक्तपदाला गेले आणि इतर व्यासादिक काय बुडाले का? श्रोता विचारतो आहे, शुक मुनी मुक्त झाले, वामदेव मुक्त झाले असे वेदात म्हटले आहे. मग बाकी सर्व बध्द आहेत का? वेदांवर अविश्वास कसा दाखवायचा? श्रोत्याने प्रश्न विचारल्यानंतर वक्ता म्हणाला, सृष्टीमध्ये दोघेच मुक्त झाले असं जर म्हटलं तर ऋषी मुनी योगी आत्मज्ञानी असंख्य पुरुष समाधानी झालेले आहेत.
त्याबरोबरच ब्रह्मा विष्णू महेश्वर दिगंबर आदि विदेही झालेले आहेत. शुक-वामदेव मुक्त झाले आणि इतर बुडाले याच एका वचनावर विश्वास ठेवणारे पढतमूर्ख आहेत. मग वेद असे का बोलतो? तो काय तुम्ही खोटा मानता का? असं श्रोत्यांनी विचारलं. मग त्यावर वक्ता सांगतो, वेद बोलला तो पूर्वपक्ष आहे, मूर्ख फक्त तिथेच लक्ष देतात. साधू आणि व्युत्पन्न लोक यांना हे मान्य नाही. तरीसुद्धा असं मानलं तर वेदांच्या अंगी सामर्थ्य नाही असे म्हणावे लागेल. वेदांनी कोणाचाच उद्धार केला नाही असे कोणी म्हणत नाही. तसं असत तर वेदांना कोणी विचारल नसतं. लोकांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य वेदांमध्ये आहे. ज्यांना वेदाक्षर समजत त्याला पुण्य राशी म्हणतात.
वेदांच्या सामर्थ्यात काही उणे नाही. वेदशास्त्र पुराण भाग्याने श्रवण झाल्यास त्याच्यामुळे आपण पावन होतो असं साधू सांगतात. एखादा श्लोक, अर्धा श्लोक किंवा एखादे चरण, शब्द कानावर पडले तरी नाना दोष निघून जातात. असे या ग्रंथाचे महिमान व्यासांनी सांगितले आहे. एक अक्षर श्रवण केले तरी तत्काळ पावन होतो असे या ग्रंथाचे महिमान नेहमी सांगितले जाते. या दोघांशिवाय आणखी लोकांचा उद्धार झाला नाही हे म्हणणे चुकीचे आहे. लाकडासारखा निश्चेष्ट पडला तोच मुक्त झाला असं सांगून शुकाचे उदाहरण देतात. मात्र शुक मुक्त असे वेदांनी सांगितले असले तरी तो अचेतन नव्हता, तो ब्रह्माकार होता. अचेतन असता तर शुक ब्रह्माकार झाला नसता, तो योगेश्वर होता. तरी याच्यावर सारासार विचार करून बोलायला हवं. जो ब्रह्माकार झाला तो लाकडासारखा होऊन पडला असे नसून शुकाने परिक्षिताला भागवत सांगितले होते.
निरूपण हे सारासार विचार करून बोललं पाहिजे, त्याच्यातील दृष्टांत व्यवस्थित विचार करून स्वीकारले पाहिजेत. क्षणात ब्रह्म व्हावे आणि क्षणात एक दृश्य शोधावे, नाना दृष्टांत आपल्या वक्तृत्वात द्यावे. भागवताचे निरूपण असं शुक मुनींनी सांगितलंय त्याच्या अंगी बद्धपण लावू नये. म्हणून बोलताना, चालताना, हालचालविरहीत असताना सद्गुरूच्या कृपेने सायुज्यमुक्ती लाभते. एक मुक्त, एक नित्यमुक्त, एक जाणावा जीवनमुक्त, एक समाधानी विदेहमुक्त. सचेतन असून जीवनमुक्त, अचेतन असून विदेहमुक्त झालेले दोन्ही देखील नित्यमुक्त योगेश्वर जाणावे. स्वरुपाचा बोध झाल्यानंतर त्यातच स्तब्धता निर्माण होते ती तटस्थता जाणावी. तटस्थता आणि स्तब्धता ही देहाशी संबंधित असलेली गोष्ट आहे. असं मुक्त व्यक्तीचे वर्णन समर्थ रामदास स्वामी महाराज करीत आहेत. हे पुढील कथा ऐकू या पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण :पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७