प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शने
घोषणांनी परिसर दणाणला : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे द्यावे वेतन
नाशिक : एसटी कामगारांचे वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे व्हावे यांसह कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे शुक्रवारी (दि.२३) राज्यभर निदर्शने झाली. त्याअंतर्गत पेठरोड येथील विभागीय कार्यशाळा एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
कृती समितीचे एस टी कर्मचारी दुपारी एकत्र आले. ‘आमच्या मागण्या मान्य करा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार द्या आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर द्वारसभा घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात टाळाटाळ केल्याप्रकरणी सरकारला खडे बोल सुनावले. सोबतच मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास सरकार कर्मचाऱ्यांच्या अधिक तीव्र रोषाला जावे लागेल, असा इशारा देण्यात आला.एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. त्यावर कामगारांच्या मागण्यासंदर्भात समितीस्थापन करून आठवडाभरात समितीचा अहवाल मागवण्यात आला होता. त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी मंगळवारी (दि.२०) होणारी बैठक मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे पुढे ढकलण्यात आली. यामुळे कामगारांनी निदर्शनांमार्फत सरकारला मागण्यांची आठवण करून दिली.
यावेळी कृती समितीचे पदाधिकारी सुनील जाधव,प्रशांत सोनवणे, राजेंद्र पालखेडकर, विलास जाधव, मानाजी सुर्यवंशी, हरिश्चंद्र ठाकरे, किशोर टोचे, प्रमोद सावळे,प्रकाश मोरे,एकनाथ देवरे, श्याम बदादे, साहेबराव देवरे, भाऊसाहेब निकम, विजय चव्हाण, प्रसाद आहेर, कल्पना चौरे, रत्नप्रभा वाडेकर, सुरेखा जाधव व इतर सभासदांच्या उपस्थितीमध्ये द्वारसभा झाली.