मुंबई,दि,३ नोव्हेंबर २०२४ -एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारी अग्रीम रक्कम आणि दिवाळी भेट मिळालीच नाही. यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात साजरी झाली शासनाच्या या उदासीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे.एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट आणि अग्रिम रक्कमही मिळाली नाही. त्यामुळे कर्मचारी संतापले असून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते व महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांचा निषेध करण्यात आला.दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी तर पुन्हा एकदा कामगारांना चक्काजाम करण्याची हाक दिली असून सोशल मीडियायावर एक क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे.
दरवर्षी एसटी कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांची अग्रीम उचल व ६ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येते. कर्मचाऱ्यांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी दिवाळीपूर्वीच अग्रीम रक्कम आणि दिवाळी भेट देण्यात येते. परंतु यावर्षी दिवाळी झाली तरी अद्याप निर्णय झाला नाही.
एस टी कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी अग्रीम उचल व दिवाळी भेटीसाठी सुमारे ५ कोटींची रक्कम विभागासाठी येत असते. यातील एकही रुपया अद्याप आला नसल्याने कर्मचाऱ्यांना दिवाळी अंधारातच गेली आहे.
आज रविवारी भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. तरी यावर निर्णय झाला नसल्याने दिवाळी भेट व अग्रीम रक्कम मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह विविध एसटीच्या संघटनांत नाराजी पसरली आहे
प्रतिक्रिया
शासन व महामंडळ कर्मचाऱ्यांची गळचेपी करत आहे. शासनाला भविष्यात याची किंमत मोजावी लागेल.
संदीप शिंदे, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना.
एसटी कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षी महामंडळाकडून पाच हजार रुपये दिवाळी भेट दिली होती. यंदाही सहा हजार रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर झाला. परंतु पुढे काहीच झाले नाही. श्रीरंग बरगे सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस.