नाशिक,११ ऑक्टोबर २०२२ – सांगली जिल्हा अस्थिरोग संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे वार्षिक अधिवेशन नुकतेच गोव्यात संपन्न झाले. ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या तीन दिवसीय अधिवेशनाप्रसंगी राज्याची वार्षिक सर्वसाधारण सभाही पार पडली. या सभेत २०२४ चे वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला, अशी माहिती नाशिक अस्थिरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय धुर्जड यांनी दिली.
अधिक माहिती देताना डॉ. धुर्जड यांनी सांगितले की राज्यभरातून एकूण सात जिल्हा संघटनांनी २०२४ च्या अधिवेशनासाठी दावा केला होता. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नवी मुंबई, नांदेड येथील संघटनांनी नाशिकच्या विनंतीला मान देत आपले दावे मागे घेतल्याने या अधिवेशनाचे यजमानपद नाशिकला बहाल करण्यात आले. अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे या अधिवेशनाचे यजमानपद मिळणे आमच्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी नाशिकची बाजू भक्कमपणे मांडत सर्वांचे मन वळवून नाशिकच्या बाजूने कौल मिळवला. मागील काही वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याने मला अत्यंत आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. धुर्जड यांनी व्यक्त केली.
शैक्षणिक व शास्त्रीय ज्ञानाच्या देवांघेवाणासाठी दर वर्षी असे अधिवेशन भरवले जाते. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील अस्थिरोग तज्ञ या अधिवेशनात सामील होऊन आपले ज्ञान, अनुभव तसेच कौशल्याचे प्रदर्शन करत इतरांना त्याचा लाभ मिळवून देतात. व्याख्याने, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रबंध, तसेच लाईव्ह ऑपरेशनद्वारे प्रात्यक्षिक दाखवले जातात. गेल्या काही वर्षांत अस्थिरोग विषयात झालेली प्रगती, नवनवीन तंत्रज्ञान, विभिन्न तंत्र, संशोधन व विकासाचा लाभ रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात अशा अधिवेशनाचा सर्वसाधारण अस्थिरोग तज्ञांना लाभ होतो. नाशिकमध्येही अनेक गुणवंत डॉक्टर असून त्यांच्या कामाचे देशभरातून कौतुक केले जाते. अशा कौशल्यावर डॉक्टरांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या अधिवेशनाचे यजमानपद मिळावे यासाठी डॉ. धुर्जड प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. तुषार देवरे, डॉ. नितीन हिरे व इतर सदस्यांची साथ लाभली.