नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल
बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबतची पार्टी भोवली
नाशिक,दि,२९ फेबुवारी २०२४ –कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याच्या प्रकरणावरुन अडचणीत सापडलेल्या नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी १९९३ साली झालेल्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याच्या प्रकरणामुळे बडगुजर चर्चेत आले होते आणि आता तेच प्रकरण त्यांना भोवले असल्याची चर्चा आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बडगुजर यांच्या नातेवाईकांच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ता सोबत झालेल्या पार्टी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता बरोबर सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा एक तथाकथित व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. तर, गेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे, शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी सलीम कुत्ता पार्टी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. याच प्रकरणात नाशिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशी करण्यात येत होती. या पार्टीत बडगुजर उपस्थित होते, काही भेटवस्तू दिल्या गेल्या असे पोलीसांच्या चौकशीत झाले निष्पन्न झाले आहेत.त्यामुळे बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलाम अंतर्गत बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कारवाईनंतर आता ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे.