अवघ्या दोन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या युवा दाम्पत्याची आत्महत्या
डायरीत लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट मुळे या दुर्दैवी घटनेमागील सत्य आले बाहेर
नाशिक,१९ डिसेंबर २०२२ – सुमारे साडेसहा लाखांची आर्थिक फसवणूक झाल्यानंतर सातत्याने पैसे वसुलीच्या फोन कॉल्सला कंटाळून एका युवा दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली आहे. या दांपत्याचा अवघ्या दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांनी एकाच वेळी गळफास घेत जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.सुसाईड नोटमध्ये युनूस मनियार आणि मयूर बैरागी या व्यक्ती आत्महत्येस कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दोघांनी घेतलेल्या अशा टोकाच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवार दि. १८ रोजी पावणे नऊ वाजेच्या दरम्यान पाथर्डी फाटा परिसरातील गौरव जितेंद्र जगताप (२९) आणि नेहा गौरव जगताप (२३, रा. पाथर्डी फाटा) या दाम्पत्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.या बाबत सविस्तर हकीगत आहि की मयत नेहा यांच्या मावशी चित्रा यांनी फोन केला असता तो उचलला नसल्याने चित्रा यांनी यश जगताप याला त्यांच्या घरी पाठवले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याने यश जगताप आणि काका अरुण गवळी यांनी आजूबाजूच्या रहिवाश्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला. यावेळी गौरव आणि नेहा या दोघांना सिलिंग फॅनला दोरीच्या सहायाने गळफास घेतला असल्याचे दिसून आल्याने घटना उघडकीस आली.
मयत गौरवने कंपनीतील काम काही दिवसांपूर्वी थांबविले असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मयत दाम्पत्यावर साेमवार दि १९ रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत इंदिरानगर पाेलिस ठाण्यात यश जितेंद्र जगताप रा. राणा प्रताप चौक,सिडको यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत दाम्पत्याने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट मुळे या दुर्दैवी घटनेमागील सत्य आले प्रकाशात ! युनूस मनियार…मयूर बैरागी कोण ?
पोलिसांना घरातील डायरीत गौरव याने लिहून ठेवलेली सुसाईड आढळून आली आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की,मला जीव द्यायची वेळ युनूस मनियार मुळे आली असून, दर दहा मिनिटांनी फोनवरून धमकी देत आहे. तसेच, मयूर बैरागी मुळे माझी साडेसहा लाखांची फसवणूक झाली आहे. मयूर बैरागी कडून पप्पूदा तू पैसे वसूल करून घे. तुला आणि काकांना त्रास झाल्याबद्दल माफी मागतो. तसेच, धनंजय खैरनारचे सर्व पैसे दिले असून तो पैसे मागत असेल तर पैसे देण्यास बळी पडू नका. त्याचे वडील पैसे घेण्यासाठी जबरदस्ती करतात. त्याच्या वडिलांच्या नावावर जे कर्ज घेतले आहे. त्यातील एक वर्षाचे हप्ते मी फेडले असून, दुसऱ्या वर्षाचे हप्ते ते फेडणार आहे. गौरवचा लहान भाऊ यशला तू आई वडिलांचं नाव मोठं कर, मावशी, काकांची काळजी घ्या. माझ्याकडून सर्वाना सॉरी काही चुकलं असेल तर माफ करा असे लिहून ठेवत गौरव आणि नेहा दोघांनी स्वाक्षरी केलेली आहे.