नाशिक (प्रतिनिधी) : शब्द, सूर आणि ताल यांची वीण हलकंच उलगडणारी सकाळ, गायनातून गाणे मनात रूजत जाते आणि ते सर्वांचे होणं ही अनुभूती असते नव्या सूरांच्या परंपरेची, संस्कृतीची.आर्या गायकवाडच्या गायनातून आणि अथर्व वारेचे तबल्यातून उमटणारे स्वर-नाद रसिकांनी निश्चितच जपून ठेवले असतील निमित्त ‘सूरविश्वास’ मैफिलीचे. आर्या गायकवाडचा कोमल, ऋजू स्वर, पावसासारखा मनावर रिमझिमत होता आणि अस्सलतेचा अनुभव देत होता.
नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. आर्या गायकवाड यांचे गायन व अथर्व वारे यांचे सोलो तबला वादन तर संस्कार जानोरकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.
मैफिलीचे हे सोळावे पुष्प होते. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
आर्याने मैफिलीची सुरूवात राग-विभासने केली, बडा ख्यालाने शब्द होते ‘पिया तुम वही जावा’, जहाँ सगरी रैन गवाई’ प्रिय व्यक्तीच्या आठवणींची तिच्या विरहाची ही धून मनाची प्रेमाची शृंखला होती. शब्दातील आर्तस्वर परिणामकारक होता. त्यानंतर आर्याने ‘राम रंगी रंगले’ या अभंगातून ईश्वर भक्तीची आस व्यक्त केली आणि भावभक्तीची ओल गुंजत ठेवली.
त्यानंतर अथर्व वारेने सोलो तबलावादन सादर केले त्यात तबल्यातील विविध रागांची गती अविष्कारातून पेश केली. तबलावादनातील विविध प्रयोग सादर करून रसिकांना अनोखा आनंद दिला. त्यात राग पेशकार, कायदा, बंदीशी, रेला, अनाघात, गती, त्रितालमध्ये तबल्याचे अनोखे पैलू अथर्वची तबला वादनाची साधना दर्शवणारे होते.
पं.डॉ. अविराज तायडे म्हणाले की, नव्या पिढीतील कलाकारांना गायन कलेतील आविष्काराचे व्यासपीठ त्याचबरोबर आत्मविश्वास देण्याचे काम सूरविश्वासतर्फे करण्यात येत आहे.
विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर म्हणाले की, शास्त्रीय गायनात गुणवत्ता असलेले कलाकार आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना सादरीकरणाची संधी यापुढेही नियमितपणे प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
याप्रसंगी कलावंतांचा सन्मान नाटककार दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, नाट्य समीक्षक एन.सी. देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमास विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी, पं. अविराज तायडे, नितीन वारे, डॉ. आशिष रानडे, ज्ञानेश्वर कासार, अमर भागवत, दिलीप साळूंके, ज्योती ठाकूर, राजश्री शिंपी, कविता गायधनी, संगीता ठाकूर, शुभांगी तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.