नाशिक:२४ ऑगस्ट (प्रतिनिधी ) – नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ६:३० वाजता रागेश्री वैरागकर यांचे गायन होणार आहे. त्यांना जगदेव वैरागकर (संवादिनी) व रसिक कुलकर्णी (तबला) हे साथसंगत करणार आहेत तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे या करणार आहेत.
मैफिलीचे हे सतरावे पुष्प असून विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे.
विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. उदयोन्मुख कलावंताच्या प्रयोगशीलेचा अविष्कार रसिकांना दर महिन्याला अनुभवण्यास मिळणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रतिभाशाली गायिका म्हणून रागेश्री वैरागकर यांचा नावलौकिक आहे. संगीत क्षेत्राचा अभ्यास आणि नामवंत गुरूंचे मार्गदर्शन यामुळे रागेश्री यांचा संगीत प्रवास वैशिष्ट्यपूर्ण आहे. शुद्ध शास्त्रीय गायनाव्यतिरीक्त ठुमरी, गझल, भजन, नाट्यसंगीत, भावगीत अशा विविध प्रकारातही त्यांची स्वतंत्र शैली आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याच्या त्या शिष्या आहेत. आव्हानात्मक रागांचे सादरीकरण ही त्यांची खासियत असून त्यामुळे रसिक व संगीत समीक्षक त्यांना दाद देत असतात.
वडील जगदेव वैरागकर यांचेकडे त्यांनी गायनाचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर काका पं. शंकराव वैरागकर, शास्त्रीय गायिका गायत्री जोशी यांच्याबरोबरच पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचेही मार्गदर्शन लाभले. भारतीय गांधर्व महाविद्यालयातून एम.ए. (अलंकार) पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी विविध प्रतिष्ठेच्या महोत्सवात सादरीकरण केले असून त्यात गानवर्धन महोत्सव, पुणे, नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए), गोवा सांस्कृतिक मंडळ, गंधर्व फाऊंडेशन, कणकवली आदी महोत्सवांचा समावेश आहे. त्यांना संगीत सेवेबद्दल अनिल मोहिले विशेष पुरस्कार, नटराज पुरस्कार, गौरव मराठी मनाचा पुरस्कार, कै.डॉ. श्रीरंग संगोराम शास्त्रीय गायन पुरस्कार, पं. राम माटे पुरस्कार व महाराष्ट्र टाईम्सचा सप्तकन्या सन्मान आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन व ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर, ऋचिता ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.