आजपासून नाशकात तबला-चिल्ला -२०२३ अखंड नादसंकीर्तन…
उ.अहमदजान थिरकवाँ यांच्या स्मृतिदिना निमित्त २४ ते २६ फेब्रुवारी पर्यंत कुसुमाग्रज स्मारकात महोत्सवाचे आयोजन
नाशिक,२४ फेब्रुवारी २०२३ – पद्मभुषण उ. अहमदजान थिरकवाँ खाँसाहेब यांच्या स्मृतिदिनानिमत्त गेल्या ८ वर्षांपासून नाशिकमध्ये तबला चिल्ला या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन होत आले आहे.
आतापर्यंत भारतभरातल्या जवळपास शंभरच्यावर कलाकरांनी आपली सेवा (तबलावादन) सादर केले आहे. आजपासून नाशकात तबला-चिल्ला -२०२३ अखंड नादसंकीर्तन नाशिककारांना अनुभवता येणार आहे.
यावर्षी शुक्रवार, शनिवार व रविवार दि. २४, २५ व २६ फेब्रुवारी, २०२३ ह्या दिवसांमध्ये तबलाचिल्ला महोत्सव साजरा होणार आहे.शुक्रवार दि. २४ व शनिवार दि. २५ फेब्रुवारी सायंकाळ ५.३० ते ९.३० तसेच रविवारी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी दोन सत्रांमध्ये म्हणजेच सकाळी १० ते ०१ व सायंकाळी ५.३० पासून हा महोत्सव सुरू होणार आहे. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात सदर
कार्यक्रम होणार असून हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य असून सर्व रसिकांना अदिताल तबला अकादमीचे आग्रहाचे निमंत्रण आहे.अल्पारंभ एज्युकेशनल अॅण्ड कल्चरल फाऊंडेशन व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला जात असून एस. डब्ल्यू.एस. फायनान्शीयल सोल्यूशन व शब्दमल्हार नाशिक यांचे मोलाचे सहकार्य ह्या कार्यक्रमाकरिता लाभले आहे.
नाशिकमध्ये गेल्या २५ वर्षांपासून तबला प्रचार व प्रसाराचे कार्य करणाऱ्या आदिताल तबला अकादमीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.सलग चार सत्रांमध्ये होणाèया या कार्यक्रमाचे उद्घाटन आज शुक्रवार दि. २४ फेब्रुवारी रोजीसायंकाळी ५.३० वा. होणार असून या प्रथम सत्राची सुरूवात लखनौ येथून आलेला बाल तबलावादक आराध्य प्रविण यांच्या तबलावादनाने होणार असून त्यानंतर दिल्लीचे युवा कलाकार सुरजीत सिंग आपले तबला वादन सादर करणार आहेत.
नंतर सध्याचे आघाडीचे तबलावादक इशान घोष मुंबई यांचे तबला वादन होणार आहे. या सत्राचा शेवट लखनौ येथील प्रसिद्ध तबलावादक व गुरू पं. रविनाथ मिश्रा यांच्या तबला वादनाने होणार आहे.
द्वितीय सत्र शनिवार दि. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ५.३० वा. सुरू होणार असून ह्या सत्राची सुरूवात आदिताल तबला अकादमीचा विद्यार्थी सौरभ ठकार यांच्या वादनाने होणार असून त्यानंतर सातारा येथून आलेला गुणी बालकलाकार चैतन्य पटवर्धन आपले तबला वादन प्रस्तुत करणार आहे. यानंतर उडपी (कर्नाटक) येथून आलेला तरूण कलावंत विघ्नेश कामत आपली कला प्रस्तुत करणार असून या सत्राचा शेवट प्रसिद्ध तबला वादक व गुरू पं. रामदास पळसुले, पुणे यांच्या तबला वादनाने होणार असून ह्याच सत्रात परंपरेनुसार एका प्रसिद्द तबला मेकरचा विशेष सत्कार होत असतो ह्या वर्षी प्रसिद्ध तबला मेकर मा. हरिदास व्हटकर व किशोर व्हटकर, मुंबई यांचा सन्मान केला जाणार आहे.
तृतीय सत्राची सुरूवात रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वा. होणार असून ह्याचा प्रारंभ आदिताल तबला अकादमीचा शिष्य संकेत फुलतानकर ह्याच्या सोलो वादनाने होणार असून त्यानंतर मुंबईचे वैष्णव चव्हाण आपली कला प्रस्तुत करणार आहेत. खास ग्वाल्हेर येथून आलेले हितेंद्र श्रीवास्तव आपले तबला वादन सादर करणार आहेत.ह्या सत्राचा शेवट बनारस घराण्याचे बुजुर्ग तबलावादन व गुरू पं. किशन रामडोहकर, बनारस ह्यांच्या तबलावादनाने होणार आहे.
चतुर्थ आणि शेवटचे सत्र रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वा सुरू होणार असून ह्या सत्राचा आरंभ आदिताल तबला अकादमीचे शिष्य श्री. अथर्व वारे याच्या तबला वादनाने होणार असून नंतर प्रतिभावान तबला वादक पं. सुप्रित देशपांडे, पुणे आपले तबला वादन सादर करणार असून ह्या सत्राचा शेवट बुजुर्ग तबला वादक व अकादमीचे मार्गदर्शक गुरू पं. ओंकार गुळवडी, मुंबई यांच्या तबला वादनाने होणार आहे. ह्याच सत्रामध्ये पं. ओंकार गुळवाडी यांच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण तबला चिल्ला कार्यक्रमासाठी हार्मोनियम संगत लाभली आहे. श्री. प्रशांत महाजन, नाशिक, श्री. ज्ञानेश्वर सोनावणे, मुंबई, श्री. यशवंत थिटे, मुंबई तसेच रसिक कुलकर्णी
व दिगंबर सोनावणे यांची गेली ६०-७० वर्षे नाशिक मध्ये तबला प्रचार व प्रसाराचे कार्य करणारे प्रसिद्ध तबलावादक व गुरू कै. पं. विजय हिंगणे यांच्या पवित्र स्मृतीस हा तबला चिल्ला समर्पित करण्यात आला आहे.
या समारंभास प्रसिद्ध तबला वादन पं. किरण देशपांडे, भोपाळ, पं. शशिकांत (नाना) मुळ्ये, मुंबई, पं. मुकुंद भाले, खैरागड, पं. राम बोरगांवकर, लातुर, पं. विभव नागेशकर, मुंबई, पं. सुधाकर पैठणकर, बदलापूर यांची उपस्थिती व आशीर्वाद लाभणार आहे.