पं .भानुदास पवार स्मृती संगीत महोत्सवात बनारसच्या पं.शुभ महाराज यांचे तबलावादन

भारतरत्न पं .भीमसेन जोशी यांचे  शिष्य डॉ.अविराज तायडे  यांचे गायन

0

नाशिक,दि. १९ डिसेंबर २०२३ – गेल्या ५४ वर्षांपासून नाशिक महानगरातील संगीत क्षेत्रात तबल्याचा प्रचार आणि  प्रसार करणाऱ्या ‘पवार तबला अकादमी’  आयोजित  पं . भानुदास पवार स्मृती  संगीत महोत्सवाचे  हे २६ वे  वर्ष आहे. या निमित्ताने पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ  एज्युकेशनल अँड  कल्चरल फाऊंडेशन या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने  नाशिककरांसाठी ‘तालाभिषेक’ या संगीत महोत्सवाचे आयोजन केले गेले.

याच महोत्सवांतर्गत बुधवार उद्या दि. २० डिसेंबर २०२३ रोजी सायं  ६  वा कुर्तकोटी शंकराचार्य न्यास  सभागृह,गंगापूर रोड येथे  भारतरत्न पं . भीमसेन जोशी यांचे  शिष्य डॉ.अविराज तायडे  यांचे गायन तर बनारस  घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक  तालसम्राट पं . किशन महाराज यांचे नातू  पं .शुभ महाराज (बनारस )  यांचे एकल तबलावादन  होणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक समाजचे सरचिटणीस मा.  नितीन ठाकरे यांचे हस्ते होईल. डॉ.अविराज तायडे यांचे गायनाचे शिक्षण  पं. देवराव भालेराव , पं. रामभाऊ माटे , पं . सी . आर .व्यास आणि   पं . भीमसेन जोशी यांचेकडे झाले आहे. . नुकत्याच संपन्न झालेल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी २५ शहरांत  गायन सादर केले आहे.

बनारस  घराण्याचे तबलावादक  तालसम्राट पं . किशन महाराज यांचे नातू व शिष्य पं .शुभ महाराज (बनारस )यांचा  देश विदेशात स्वतंत्र तबलावादन आणि साथसंगत यासाठी त्यांचा नावलौकिक आहे.
या कार्यक्रमात  डॉ.अविराज तायडे यांना सुजीत  काळे (तबला) , संस्कार जानोरकर संवादिनी तर अमित भालेराव तालवाद्यांवर साथसंगत करतील .  पं .शुभ महाराज यांना प्रशांत महाबळ संवादिनी साथ करतील.

कार्यक्रमाचे संयोजन  अल्पारंभ एज्युकेशनल  अँड कल्चरल फाउंडेशन संस्थेतर्फे करण्यात आले असून ह्या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला आहे . तरी नाशिककर रसिकांनी या  महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पवार तबला अकादमीचे संचालक नितीन पवार  आणि  एस.डब्ल्यू.एस.फायनान्शीयल सोल्युशन प्रा. ली. चे संचालक रघुवीर अधिकारी यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.