नाशिक जिल्ह्यात वनजमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई करा : छगन भुजबळ

0

मुंबई,दि.२१ मार्च २०२३ –नाशिक जिल्ह्यातील शेकडो एकर वनक्षेत्राची भूमाफियांकडून परस्पर विक्री करण्यात येत आहे ही बाब अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात वनजमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली.

एकीकडे आज जागतिक वन दिन साजरा करत असताना नाशिक जिल्ह्यात वनजमिनीच्या भूखंडांची परस्पर विक्री केली जात आहे ही अतिशय धक्कादायक बाब आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. यात त्यांनी म्हटले की, नाशिक जिल्ह्यात वनजमिनींवर भुमाफियांची वक्रदृष्टी पडली आहे. शासकीय यंत्रणेला भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वनजमिनी गिळंकृत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, सटाणा तसेच नाशिक तालुक्यात राखीव वनक्षेत्रातील जमिनींची परस्पर विक्री करण्यात आली असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

ते म्हणाले की, नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी शिवारात वनविभागाचे १७८४ एकराचे क्षेत्र असून त्यातील ११४७ एकर व ३३ गुंठयांचे निर्विकरण झालेले आहे. ते वजा करता उर्वरित क्षेत्रात ७६२ एकर क्षेत्र राखीव वनासाठी ठेवण्यात आले आहे. या वनजमिनीची नोंद बदलून त्या क्षेत्राला वनेत्तर दाखविण्यात येऊन तब्बल ३०० एकर वनजमिनीची खरेदी विक्रीचा व्यवहार झाला आहे. राखीव वनक्षेत्राच्या सातबाऱ्यावर थेट खाजगी कंपनीचे नाव लागल्याने वनविभागासह महसूल यंत्रणाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणाचा चौकशी सुरू असतानाच बैसाने ता.सटाणा येथील ५५ एकर जमिनीची परस्पर विक्री झाल्याचा प्रकार झाला आहे. तर नाशिक शहरालगतच्या गंगापूर, म्हसरूळ, चेहडी बु.गावातील वनजमिनींच्या सातबाऱ्यावरील राखीव वने नोंदच गहाळ झाल्याचा प्रकार घडला. त्या पाठोपाठ शिंदे गाव आणि संसारी गाव परिसरातही झाल्याची घटना घडली आहे. ही बाब अतिशय धक्कादायक असून शासनाने भूमाफियांना आळा घालावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी सभागृहात केली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.