नाशिक,दि. ७ जुलै २०२३ – पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशन आयोजित कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सहकार्याने नाशिककरांसाठी ‘तालाभिषेक बैठक ’ या छोटेखानी संगीत मैफिलीचे आयोजन दर दोन महिन्यांतून एकदा केले जाते. याद्वारे नवोदित तसेच प्रथितयश गायक व वादकांची कला जवळून अनुभवण्याची संधी संगीत रसिकांना मिळणार आहे.
या उपक्रमातील चौथी बैठक रविवार ,दि. ९ जुलै २०२३ रोजी सायं ६ वा स्वगत सभागृह, कुसुमाग्रज स्मारक ,गंगापूर रोड येथे आयोजित केली आहे. या मैफिलीत नाशिकचे युवा तबलावादक आणि गिरीश पांडे व तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य कल्याण पांडे यांचे स्वतंत्र तबलावादन होईल.कल्याण पांडे यांस भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची तबला विषयासाठी शिष्यवृत्ती मिळत असून भारतभर स्वतंत्र तबलावादनाबरोबरच गायन ,वाद्यसंगीत आणि कथक नृत्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांना त्यांनी साथसंगत केली आहे.त्यांना पुष्कराज भागवत (संवादिनी)साथ करतील.
यानंतर पुणे येथील प्रसिद्ध युवा गायिका सानिका कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन होईल. सानिका कुलकर्णी प्रसिद्ध सरोद वादक पं .राजन कुलकर्णी यांच्या कन्या व शिष्या असून त्यांनी तब्बल १० वर्षे विदुषी पं. वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडून गायनाचे रीतसर शिक्षण घेतले आहे. शास्त्रीय गायनासोबतच निर्गुणी भजन सादरीकरणात त्यांचा लौकिक आहे. आतापर्यंत त्यांनी आरोही फेस्टिवल , हरिवल्लभ समारोह जालंधर अशा अनेक प्रमुख संगीत समारोहात आपली कला सादर केली असून लोकमत सखी गौरव पुरस्कार, सूर रत्न पुरस्कार ,सुरसिंगार अवॉर्ड असे बहुमान त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांना ईश्वरी दसककर (संवादिनी ) आणि कुणाल काळे (तबला)साथ करतील.
कार्यक्रमाचे संयोजन अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन संस्थेतर्फे करण्यात आले असून ह्या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला आहे . तरी नाशिककर रसिकांनी या मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पवार तबला अकादमीचे संचालक नितीन पवार ,एस.डब्ल्यू.एस.फायनान्शिअल सोल्युशन प्रा. ली. चे संचालक रघुवीर अधिकारी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांनी केले आहे.