पुणे – कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांनंतर यावर्षी पहिल्यांदाच इयत्ता दहावी आणि बारावीची ऑफलाईन परीक्षा होणार आहे. या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असून इयत्ता १० वीची परीक्षा यंदा १५ मार्चपासून ते इयत्ता १२ वीची परीक्षा येत्या ४ मार्चपासून घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास वेळ मिळावा आणि शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळावा म्हणून यंदा १५ दिवस उशिराने या परीक्षा घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.या शिवाय दोन्ही परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाऊन परीक्षा देण्याची वेळ येणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी १५ मिनिटे ते अर्धा तासाची वेळही वाढवून देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचे नियम पाळून या परीक्षा घेण्यात येणार आहेत. १० वी आणि १२ वीच्या परीक्षेसाठी अधिकचा वेळ वाढवून देण्याचा निर्णय झाला असून या दोन्ही परीक्षेच्या ४० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटं अधिक वेळ देण्यात येणार आहे. तसेच ७०, ते १०० गुणांसाठीच्या परीक्षेसाठी अर्धा तास देण्यात येणार आहे.
परीक्षेचे पेपर किती वाजता सुरु होणार !
१० वी आणि १२ वीचे सकाळच्या सत्रातील पेपर दरवर्षी सकाळी ११ वाजता सुरू होतात. परंतु यंदा हे पेपर सकाळी १० वाजून ३० मिनिटाने सुरू करण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना १० मिनिटे दिली जातात. ही दहा मिनिटे यंदाही दिली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष १० वाजून २० मिनिटाने सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात २ वाजून ५० मिनिटाने प्रश्नपत्रिका मिळणार आहे.
त्यामुळे विद्यार्थी वाढीव वेळेनुसार परीक्षा देऊ शकणार आहेत. कोरोनामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. प्रत्यक्ष शाळेत हजर राहू न शकल्याने गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला असल्याने ही वेळ वाढवून दिली आहे.
यंदा १२ वीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च असणार आहे. प्रॅक्टिकलच्या अभ्यासक्रमाच्या ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रॅक्टिकलची परीक्षा होणार आहे. तसे निकष तज्ज्ञांना विचारून करण्यात आल्याचं अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं. दहावीचे अंतर्गत मूल्यमापण किंवा प्रॅक्टिकल ४० टक्के अभ्यासक्रमावरच असेल.