मुंबई,दिनांक – २८ जुलै २०२५ – Thackeray Brothers Unity मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि दोघे बंधू एकत्र आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत त्यांनी काही काळ एकांतात वेळ घालवला. या भेटीनंतर एकच चर्चा रंगली – “ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार?”
ठाकरे युतीची चर्चा आणि शिंदेंच्या इनकमिंगला ब्रेक?(Thackeray Brothers Unity)
राजकीय वर्तुळात सध्या सर्वात मोठा चर्चेचा विषय म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या ४० दिवसांत एकही नवीन प्रवेश न झाल्याची नोंद. मुंबईसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात असा अचानक थांबलेला पक्षप्रवेशाचा ओघ अनेक प्रश्न निर्माण करत आहे. यामागे ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकीचा परिणाम असल्याचं बोललं जातंय.
नगरसेवकांची परतीची वाट?
२०१७च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले ९९ पैकी ५३ नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे राहिले, तर ४६ नगरसेवक शिंदेंकडे गेले. मात्र आता काही माजी नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गोटात परतण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे.
शीतल म्हात्रेंचा दावा
या चर्चांदरम्यान, शिंदे गटाच्या आमदार शीतल म्हात्रेंनी हे वृत्त फेटाळले आहे. “कालच दोन माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला असून आगामी काळात अनेक बड्या नावांचा प्रवेश होणार आहे,” असं म्हात्रेंनी स्पष्ट केलं. मात्र, राजकीय विश्लेषकांचा दावा वेगळा आहे – “प्रवेश होत असतील, पण आधीसारखा ओघ राहिलेला नाही.”
ठाकरेंच्या एकीमुळे महापालिकेवर परिणाम?
जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरोखरच एकत्र आले, तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. दोघांची ताकद एकत्र आल्यास, मराठी मतदार पुन्हा शिवसेना ब्रँडकडे आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे महायुतीत अस्वस्थता निर्माण झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय.
महायुतीचा ‘प्लान बी‘
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं ‘नो रिस्क’ धोरण आखलं आहे. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून लवकरच मतभेद मिटवण्याची रणनिती आखली जात आहे. भाजप, शिंदे गट आणि नाराज नेत्यांमध्ये समन्वय वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बाळासाहेबांच्या खोलीतील क्षण
राज ठाकरे जेव्हा मातोश्रीवर पोहोचले, तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत गेले. त्याठिकाणी राज-उद्धव यांनी काही काळ एकांतात गप्पा मारल्या. यानंतर रश्मी ठाकरे, संजय राऊत, बाळा नांदगावकर यांच्यासह इतर नेते खोलीत आले. वातावरण जरी कौटुंबिक असलं, तरी यामागे राजकीय संकेत असल्याचं अनेकांनी सूचित केलं.
ठाकरे बंधू काय म्हणाले?
उद्धव ठाकरे म्हणाले,
“नक्कीच पुढचा काळ चांगला असेल. आम्ही खूप वर्षांनी भेटलो. ज्या घरात वाढलो, त्यात भेटलो. बाळासाहेबांच्या खोलीत गेलो. हा आनंद कित्येक पटीने मोठा आहे.”
राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लिहिलं,
“माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्रीला जाऊन शुभेच्छा दिल्या…”
आगामी निवडणुकांसाठी बदलत्या समीकरणांची नांदी
ठाकरे बंधूंची ही भेट केवळ कौटुंबिक नाही, तर राजकीय नकाशावर मोठा प्रभाव टाकणारी घटना ठरू शकते. जर ही एकता ठरली, तर ती फक्त एकनाथ शिंदेंनाच नव्हे तर महायुतीसाठीही मोठं आव्हान असेल. मुंबई महानगरपालिका निवडणुका म्हणजे शिवसेनेचं बालेकिल्ला आणि राजकीय अस्तित्वाचा गाभा. त्यामुळे प्रत्येक हालचालीकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
[…] आहे. १८ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण ही […]