नाशिक,२५ नोव्हेंबर २०२२- पुस्तके ही आनंद देणारी गोष्ट असून जगण्याचं आणि वास्तव जगण्याचे प्रतिबिंब त्यात सामावलेले असते त्यामुळेच पुस्तकांशी मैत्री ही जन्मभराची शिदोरीअसते असे प्रतिपादन ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे शिल्पकार विनायक रानडे यांनी केले.
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास को-ऑप बँक लि., ग्रंथ तुम्हारे द्वार, माय बुक बास्केट व विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने एम.एस. कोठारी शाळा द्वारका सर्कल, नाशिक येथे पुस्तक घ्यावे, पुस्तक द्यावे, अखंड वाचीत जावे… या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 25 नोव्हेंबर व शनिवार 26 नोव्हेंबर 2022 रोजी दोन दिवस या योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना रानडे बोलत होते.
विश्वास ग्रुपचे कुटुंब प्रमुख विश्वास जयदेव ठाकूर हे या उपक्रमाचे मार्गदर्शक आहेत. व रेडिओ विश्वासच्या समन्वयक ऋचिता विश्वास ठाकूर या उपक्रमाच्या समन्वयक आहेत. वाचकांनी त्यांना आवडलेले पुस्तक मोफत घेऊन जावे आणि आपल्या जवळील एक पुस्तक देऊन जावे असे उपक्रमाचे स्वरूप आहे. आज 500 हुन अधिक विद्यार्थ्यांनी आपल्याकडील जुने पुस्तके देऊन पुस्तक बदलुन नेले. यावेळी विद्यार्थ्यांना आपली आवडलेली पुस्तके घेऊन आपला आनंद द्विगुणित केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता देशपांडे, पर्यवेक्षिका वैशाली आठल्ये, धनश्री कुलकर्णी, चेअरमन सचिन महाजन, ग्रंथपाल स्मिता सैदानकर इ. उपस्थित होते.