नाशिकमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट
शिवसेनेसोबतच असल्याची दिली ग्वाही...
नाशिक –जिल्ह्यातील एक खासदार व दोन आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले असले तरी आम्ही शिवसेना व पक्षप्रमुखांच्या सोबतच असल्याची ग्वाही आज (दि.२४) महापालिकेतील नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली. जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी सकाळी ‘मातोश्री’ येथे पक्षप्रमुखांची भेट घेतली.
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी महापौर वसंत गिते, शहरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिका तसेच त्र्यंबकेश्वर येथील नगरसेवक आज मातोश्री येथे पोहोचले.
माजी उपमहापौर प्रथमेश गिते,प्रशांत दिवे,आर.डी. धोंगडे, मुशीर सय्यद, संतोष गायकवाड, सूर्यकांत लवटे, प्रवीण तिदमे,हेमलता गायकर, मटाले तसेच त्र्यंबकेश्वर येथील ललिता शिंदे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व उपस्थितांना सभासद नोंदणी वर लक्ष केंद्रीत करायला सांगितलं. बंडखोरांना जनताच धडा शिकवणार आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आक्रमक होण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच संघटना बळकटी उभी रहावी यासाठी प्राधान्य देण्याचे आवाहन केले. शिवसेना सध्या कायदेशीर लढाई लढत असून त्यादृष्टीने सर्व नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांकडून कायदेशीर कागदपत्रांची पूर्तताही करून घेण्यात आली.