यावर्षी देशात सरासरीच्या ९६ % पाऊस होणार : भारतीय हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रात काय असणार पावसाची स्थिती !
नवी दिल्ली,दि. ११ एप्रिल २०२३ – दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात.देशात यंदा सामान्य पाऊस राहणार असून यंदा देशात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज पत्रकार परिषदेत दिली आहे.९६ ते १०४ टक्क्यांच्या दरम्यान होणाऱ्या पावसाला सामान्य पाऊस म्हटलं जातं. आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. देशात यंदा ८७० मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान विभागाचा दिर्घकालीन अंदाज आहे.
सध्या वर्तवण्यात आलेला दीर्घकालीन अंदाज एप्रिलच्या सुरुवातीला असलेल्या वातावरणातील स्थितीच्या आधारावर देण्यात आला आहे.जून ते सप्टेंबर दरम्यान देशात ८३५ मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी असली तरी महाराष्ट्रात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
अखेर आज हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे. दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी अलीकडच्या काळात अत्याधुनिक प्रारूपे तयार करण्यात आली आहेत. त्यात वाऱ्यांची दिशा, अवकाश, समुद्राची स्थिती आदींचा सातत्याने अभ्यास केला जातो. त्यासाठी हवामान केंद्रांसह उपग्रह, रडार यंत्रणा यांचा आधार घेतला जातो. हंगामाच्या कालावधीत ही स्थिती कशी राहील, याचा अंदाज प्रारुपांच्या आधारे मांडला जातो आणि त्यावरुन त्या काळातील हवामानाची आणि पावसाची भाकिते केली जातात