सावानाचा कार्यक्षम खासदार स्मृती पुरस्कार आरोग्यमंत्री ना.डॉ.भारतीताई पवार यांना जाहीर

0

नाशिक,दि.१८ नोहेंबर २०२३ –सार्वजनिक वाचनालय,नाशिक या संस्थेतर्फे दरवर्षी स्व.माधवराव लिमये याच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार सन २०२२-२३ चा कार्यक्षम खासदार पुरस्कार आरोग्यमंत्री ना. डॉ. भारतीताई पवार यांना जाहीर झाला आहे. यापूर्वी हा पुरस्कार महाराष्ट्रातील कार्यक्षम आमदार यांना दिला जात होता. मागील दोन वर्षापासून या पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली असून वर्षा आड हे पुरस्कार विधीमंडळ सदस्य आणि संसद सदस्य यांना दिले जात आहेत.

स्व. माधवराव लिमये हे नाशिकचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ समाजवादी नेते होते त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. स्व. लिमये हे पत्रकार, लेखक व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक आणि तळमळीचे कार्यकर्ते होते. त्यांचा सार्वजनिक वाचानाल्याशी घनिष्ठ संबंध होता. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची कन्या डॉ. शोभाताई नेर्लीकर व जावई डॉ. विनायक नेर्लीकर यांनी दिलेल्या देणगीतून सदरचा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थं निवड समिती दरवर्षी विधान परिषद, विधान सभा, लोक सभा, राज्य सभा ह्या पैकी एका सदस्याची निवड ही कार्यक्षम आमदार/खासदार पुरस्कारासाठी निवड करीत असते.

खासदार हेमंत गोडसे, आय बी एम लोकमत दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास, पत्रकार मंगेश वैशंपायन (दिल्ली), लोकमतचे उपसंपादक संजय पाठक, डॉ. विनायक नेर्लीकर, डॉ. सौ. शोभाताई नेर्लीकर, डॉ. आर्चिस नेर्लीकर व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, कार्याध्यक्ष गिरीश नातू, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके या निवड समितीवर पुरस्कार निवडीची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

रु. ५० हजार रोख, स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे २० वे वर्ष आहे. मागील १९ वर्ष अनुक्रमे सर्वश्री आ. बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद नवलकर, शोभाताई फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा. रे. पाटील, भाऊसाहेब फुंडकर, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, ओमप्रकाश तथा बच्चूभाऊ कडू, निलमताई गो-हे, ना. गिरीश महाजन, ना. धनंजय मुंडे, खा. नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार ह्या मान्यवर खासदार तसेच आमदारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.जानेवारी,२०२४ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सप्ताहात या पुरस्काराचे वितरण होणार असून त्यासाठी ना.डॉ.भारतीताई पवार यांनी संमती दिली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.