दत्ता पाटील यांना नाट्यलेखनासाठी धि गोवा हिंदु असोसिएशनचा पुरस्कार

0

नाशिक,१६ नोव्हेंबर २०२२ – मराठी रंगभूमीवर गेली १०३ वर्ष कार्यरत असलेल्या धि गोवा हिंदु असोसिएशन च्या वतीने उत्कृष्ट संहितेसाठी देण्यात येणारा यंदाचा नाट्यलेखन पुरस्कार नाशिकचे दत्ता पाटील यांना ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकासाठी जाहीर झालाय. डॉ. सुभाष भेंडे पुरस्कृत शशिकांत नार्वेकर स्मृती पुरस्कार या नावाने हा पुरस्कार नाट्यलेखकांना दिला जातो, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अशोक आमोणकर यांनी पत्राद्वारे दिली.

धि गोवा हिंदु असोसिएशनच्या वतीने साहित्य क्षेत्रात विविध पुरस्कार दिले जातात. त्यात कविवर्य बा.भ. बोरकर स्मृती पुरस्कार गोमंतकीय साहित्यिक गजानन देसाई, अनुवादासाठी डॉ. सुभाष भेंडे पुरस्कृत प्रा.जी.ए.कुलकर्णी स्मृती पुरस्कार शिरीष सहस्त्रबुद्धे यांना, मा. दत्ताराम स्मृती पुरस्कार जयंत सावरकर यांना, अरविंद नारायण म्हाम्ब्रो स्मृती पुरस्कार कोकणी साहित्यासाठी संपदा कुंकळकर आणि उत्कृष्ट नाट्यसंहितेसाठी डॉ. सुभाष भेंडे पुरस्कृत शशिकांत नार्वेकर स्मृती पुरस्कार नाशिकचे दत्ता पाटील यांना जाहीर करण्यात आला. याआधी हा सन्मानाचा पुरस्कार जयंत पवार, राजीव नाईक, शफाअत खान, अभिराम भडकमकर, मकरंद साठे, सचिन कुंडलकर, शेखर ढवळीकर आणि रत्नाकर मतकरी या मान्यवरांना प्राप्त झालाय. येत्या २० नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईतील स्वा. सावरकर स्मारक (शिवाजी पार्क) येथे दुपारी ४.०० वाजता हा पुरस्कार दिला जाईल.

दत्ता पाटील गेली वीस वर्ष मराठी रंगूभूमीवर नाटककार म्हणून सुपरिचित असून, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात जनसंपर्क व नाट्यशास्त्र विभागाची ते जबाबदारी सांभाळत आहेत. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांची अनेक नाटके नावाजली गेली. हंडाभर चांदण्या या नाटकाने मराठी प्रायोगिक रंगभूमीला महत्वाची दिशा दिली असे म्हटले जाते. हे नाटक श्रीमती सुमती लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनने पुस्तक रूपात प्रकाशित केले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीए प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमालाही शिकवले जाते.

महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका, नाट्यनिर्माता संघ, नाट्य परिषद यासह अनेक महत्वाचे पुरस्कार मिळविणाऱ्या या नाटकाने भारंगमसह विविध महत्वाचे महोत्सव गाजवले आहेत. प्रमोद गायकवाड यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले असून दत्ता पाटील लिखित ‘तो राजहंस एक’ हे महत्वाचे नवे नाटक परिवर्तन, सातारा या संस्थेच्या अतुल पेठे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मानसरंग या नाट्य प्रकल्पांतर्गत सध्या मराठी रंगभूमीवर गाजत आहे. या नाटकात प्रसिद्ध अभिनेत्री अनीता दाते, प्राजक्त देशमुख, प्रणव प्रभाकर हे कलावंत काम करत आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!