नाशिक (प्रतिनिधी)- शब्द, सूर, ताल यांचा त्रिवेणी संगम असलेल्या ‘शब्द झुल्यातील गाणी’ या बहारदार आणि तितक्याच तरल मैफीलीला रसिकांनी जोरदार दाद दिली. कवितेचं गाणं होतांना शब्दांचा अलगद, हळुवार नाद रसिकांना साद घालत होता. सूर विश्वास व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज स्मारक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाची संकल्पना नाशिकचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार मिलिंद धाटिंगण यांची होती. त्यांच्या अतिशय कलात्मक दिग्दर्शनाने या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली.
मिलिंद धाटिंगण यांच्या आभा, तरंग, लाभले आम्हा या रचनांना काव्य रसिकांची भरभरून दाद मिळाली.अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या गीतांना मिलिंद धाटिंगण यांनी स्वरसाज दिला असून त्यांनी अतिशय तयारीने त्या सादर केला .अतिशय प्रभावी शब्दफेक आणि शास्त्रीय बैठक असलेली त्यांची गायकी रसिकांनी पुन्हा एकदा अनुभवली या रचना संगीता ठाकूर आणि कविता शिंगणे यांच्या होत्या.
अनुराग केंगे यांनी सर्व कविता प्रभावीपणे पडद्यावर मांडल्या आणि काव्य गायनाचा दृकश्राव्य अनुभव रसिकांना दिला.शब्द हे मानवी मनाशी किती सहज नाते जोडतात याची प्रचिती देणारे होते. संजय कंक यांनी शब्दांची महती सांगितली.
शब्द हे साधन आहे
शब्द प्रबोधन आहे
मनाला श्रीमंत करता
शब्द धन आहे
अशा जाणीवेतून कवितेतून ऋण व्यक्त केले.
त्यानंतर संगिता ठाकूर यांनी
रिमझिम ही पुन्हा की भास
तुझा हा सांग ना
दिसलीस तू का बरसली
सर पुन्हा सांग ना
अशा एकाहून एक सरस कवितांनी मैफीलीत रंग भरला. कवितेची निर्मिती प्रक्रिया कवी, कवयित्रींनी उलगडून दाखवली आणि सुशिला संकलेचा यांनी कवितेतून मांडलेला हळूहळू गडद होत जाणारा अंधार, शांत निवारा, समुद्र किनारा, मनाची अवस्था प्रकट करणारा होता.
डॉ सुमुखी अथणी यांच्या विलोभनीय पदन्यासातून एक एक कविता उलगडत गेली आणि हे सादरीकरण रसिक मनाला भुरळ घालून गेले. या मैफिलीत नाशिकमधील कवींच्या कवितांना स्वरसाज देण्यात आला. त्यात कवी राजू देसले, कविता गायधनी, संगीता चव्हाण, संजय कंक, पुष्कर चोळकर, सुशिला संकलेचा, स्वाती पाचपांडे यांच्या कविता सादर करण्यात आल्या.मिलिंद धटिंगण, राजश्री शिंपी, विवेक केळकर, अलोक जोशी आदींनी गायन केले. मैफिलीचे निवेदन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले तर कार्यक्रमास पं. मकरंद हिंगणे याचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे नृत्य डॉ. सुमुखी अथणी यांनी सादर केले. संगीत अनिल धुमाळ यांचे होते तर काव्यचित्र, रेखाटन पूजा बेलोकर, दिनेश पैठणकर,प्रकाश योजना विनोद राठोड यांची तर ध्वनीव्यवस्था सचिन तिडके यांची होती.काव्य गायनाचा सशक्त अनुभव दिला.
या कार्यक्रमास सुरतचे जीएसटी आयुक्त प्रमोद वसावे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की कवितांना, गीतांना एका धाग्यात गुंफणारी सुंदर मैफल आहे. जीवनात आनंद किती सहजपणे फुलवता येते याची प्रचिती या कवितांतून येत आहे. यावेळी त्यांनी कार्यक्रमाला नाशिककर रसिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल कौतुक केले व मराठी भाषेच्या विकासासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर म्हणाले की, स्मार्ट सिटी, विकास ह्या संकल्पनेपेक्षा इथल्या शहरातील जनतेची, रसिकांची मने किती कलासक्त आहेत. त्यावर त्या शहराची सांस्कृतिक उंची ठरत असते. ‘विश्वास ग्रुप’ नाशिकच्या कलावंतांना व्यासपीठ देण्यासाठी कायमच अग्रेसर आहे.