देशाचा पुढील पंतप्रधान मराठी असेल – पूर्व रॉ प्रमुख ए एस दुलत

सरहद,आयोजित संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार २०२०-२०२१ चे नवी दिल्लीत वितरण

0

नवी दिल्ली – भारताचे पुढील पंतप्रधान हि एक मराठी व्यक्ती असेल. अशी व्यक्ती जी संत नामदेवांच्या विचारांचा पुरस्कार करेल, असे गौरवोद्गार भारतीय गुप्तचर विभागाचे माजी विशेष संचालक ए.एस.दुलत यांनी दिल्ली येथे काढले. ते २०२० आणि २०२१ या वर्षांसाठी देण्यात येण्याऱ्या संत नामदेव पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

२०२० आणि २०२१ चा संत नामदेव पुरस्कार अनुक्रमे दुलत आणि मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या हस्ते देण्यात आला. दिल्ली शिख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष हरमीत सिंह काल्का हे पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष होते.   दुलत यांना २०२० चा १६वा संत नामदेव पुरस्कार देण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, “भारताचे पुढील पंतप्रधान हे मराठी असतील. काही वर्षांपूर्वी मी पुण्यात एका कार्यक्रमात देखील हेच म्हणालो होतो. त्यावेळी श्रोत्यांनी माझ्या या वक्तव्याला मोठा प्रतिसाद दिला होता.” आज माझ्या त्या व्यक्तव्याचा मी पुनरुच्चार करीत आहे.

संत नामदेव पुरस्कार दरवर्षी पुण्यातील सरहद संस्थेतर्फे दिला जातो. सरहद गेली चार दशके सीमावर्ती भागातील संघर्षाने प्रभावित लोकांसाठी काम करत आहे. सरहद अशा सीमावर्ती भागातील लोकांचे पुण्यातील व महाराष्ट्रातील लोकांशी संबंध दृढ होण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. हा पुरस्कार सीमावर्ती भागातील अशा लोकांशी महाराष्ट्राचे नाते जोडण्यासाठी काम करणाऱ्या प्रतिष्ठित पंजाबी व्यक्तींना दिला जातो. तेराव्या शतकातील संत-कवी नामदेव यांच्या नावाने हा सन्मान दिला जातो.

एक लाख रुपये, संत नामदेवांची प्रतिमा आणि सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार आहे. सत्काराला उत्तर देताना मलिक म्हणाले, “शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले म्हणजे ते मागे हटले असे समजू नये. शेतकऱ्यांनी नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.” संतांच्या विचारांचे अनुकरण करणे म्हणजे सत्याचे अनुकरण करणे आणि महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. संत नामदेवांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना मी अत्यंत आनंदी आहे. सामान्य माणसांसाठी आणि सत्यासाठी माझे उर्वरित आयुष्य समर्पित करेल हीच संत नामदेव यांना खरी आदरांजली असणार आहे.

यावेळी डॉ फारूक अब्दुल्ला म्हणाले, “भारताला प्रेमच वाचवू शकेल. द्वेषावर कोठलेही राष्ट्र उभे राहू शकत नाही. आज मात्र कोणी काय खावे, काय घालावे, काय बोलावे, यावर बंधने आणली जात आहे. हे देशाच्या ऐक्याला अतिशय घातक आहे. महात्मा गांधींसारख्या राष्ट्रपुरुषांनी पाहिलेल्या भारतातच मला मरण यावे अशी माझी इच्छा आहे. द्वेषाचे राजकारण हा देशाच्या प्रगतीतील फार मोठा अडथळा आहे.हे सत्ताधार्यांना वेळेत कळले नाही तर अनर्थ होईल आधीच उशीर झाला आहे. सूड हा कोठल्याही देशाचा पाया असू शकत नाही “द्वेषाचे राजकारण देशाच्या विकासासाठी घातक असल्याचे मत त्यांनी वक्त केले.

सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी प्रास्ताविक केले. स्वागत गीत प्रांजली नेवासकर यांनी गायले या प्रसंगी डॉ शैलेश पगारिया, मा. संतसिंग मोखा, मा. सुरेंद्र वधवा, अ.भा.नामदेव क्षत्रिय समाज महासंघाचे अध्यक्ष मा. अरुण नेवासकर ,डॉ अमोल देवळेकर, सुनील चौधरी ,रोहन नेवासकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर मा. निलेश नवलाखा यांनी आभार मानले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.