नवी दिल्ली,४ जून २०२३ –ओडिशा रेल्वे अपघाताबाबत रेल्वे बोर्डाने मोठा खुलासा केला आहे.बोर्डाने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकाचा हवाला देत म्हटले आहे की, टक्कर होण्यापूर्वी दोन्ही गाड्यांना ग्रीन सिग्नल मिळाला होता. फक्त कोरोमंडल एक्सप्रेस या अपघाताचा बळी ठरली.मालगाडी लूप लाईन मध्ये उभी होती.इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकींग सिस्टीममुळे घडल्याचं समोर आलं आहे. या सिग्नल यंत्रणेत काही बदल केल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हे कारण शोधून काढल्याचं त्यांनी सांगितलं.बहनगा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास झालेला हा अपघात भारतीय रेल्वेच्या इतिहासातील चौथा सर्वात भीषण अपघात आहे. सध्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्यावर भर असल्याचंही रेल्वेमंत्री म्हणाले.
कोरोमंडल एक्सप्रेसला ग्रीन सिग्नल मिळाला होता !
जया वर्मा सिन्हा, सदस्य, संचालन आणि व्यवसाय विकास, रेल्वे बोर्ड यांनी सांगितले की, मालगाडी लूप लाइनवर उभी असतानाही कोरोमंडल एक्सप्रेसला हिरवा सिग्नल मिळाला. त्यामुळे कोरोमंडल ट्रेन रुळावरून घसरली.त्यांनी सांगितले की, अपघातानंतर रेल्वेकडून प्रथम मदत आणि बचाव कार्य करण्यात आले. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू आहे.
येत्या काळात ‘कवच’ निर्यात करणार आहे
जया वर्मा सिन्हा म्हणाल्या की, ‘कवच’ ही भारतात बनलेली प्रणाली आहे. आगामी काळात आपण त्याची निर्यातही करू शकू. त्याचा संबंध रेल्वेच्या सुरक्षेशी आहे. म्हणूनच आम्ही त्याची कठोर चाचणी केली आहे. रेल्वेमंत्र्यांनी स्वत: ट्रेनमध्ये बसून तपासणी केली. हे उपकरण सर्व मार्गांवर आणि ट्रेनमध्ये बसवण्यास वेळ आणि पैसा लागेल.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. सध्या १००० हून अधिक कामगार दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. पोकलेन मशी आणि क्रेन्सच्या साहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त गाड्या आणि मालगाडी रेल्वे रुळावरून हटवण्यात आल्या आहेत.ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून रेल्वे रुळ दुरुस्तीसाठीही कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २८८ वर पोहोचली
ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, काल रेल्वेने सांगितले की मृतांची संख्या २८८ वर पोहोचली आहे. काल रात्री डीएम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने प्रत्येक मृतदेहाची तपासणी केली. डीएम द्वारे डेटा तपासला गेला आणि असे आढळले की काही मृतदेह दोनदा मोजले गेले, त्यामुळे मृतांची संख्या २८८ वर सुधारली गेली. १,१७५ जखमींपैकी ७९३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.