पार्वतीबाई आणि शंकर महाराज यांचे नाते होते खास !

0

मुंबई –कलर्स मराठीवर ३० मेपासून शिरीष लाटकर लिखित “योगयोगेश्वर जय शंकर” ही नवी मालिका सुरू होत आहे. शंकर महाराजांचे भक्तगण त्यांना साक्षात शंकराचाच अवतार मानतात. मैं कैलाश का रहने वाला हू,मेरा नाम है शंकर असं बोलत ज्यांनी अनेक पीडितांच्या दु:खांचे निवारण केले, ज्यांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहे, महादेवाचा अंश जे आहेत, असे असंख्य भक्तांचे कैवारी, त्रिलोकी आहे ज्यांची कीर्ती संतवर्य योगीराज, सद्गुरू राजाधिराज “शंकर महाराज”. एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर कलर्स मराठी घेऊन येत आहे.

मालिकेमध्ये शंकर महाराज्यांच्या आईची भूमिका आपल्या सगळ्यांची लाडकी उमा पेंढारकर साकारणार आहे. उमाने याआधी कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेमध्ये पार्वतीबाईंची साकारली होती. तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आणि आता ती पुन्हाएकदा योगयोगेश्वर जय शंकर या मालिकेमध्ये पार्वतीबाई यांची भूमिका वठवणार आहे. तर, वडिलांची (चिमणाजी) भूमिका अतुल आगलावे साकारणार आहेत. आणि बाल शंकर महाराजांची भूमिका आरुष बेडेकर साकारणार आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना उमा म्हणाली, “कलर्स मराठीवर स्वामिनी मालिकेत पार्वतीबाई पेशवा हे पात्र साकारल्यावर आता प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि महाराजांच्या आशीर्वादामुळे पुन्हाएकदा पार्वतीबाई म्हणून मी आपल्या भेटीस येते आहे. दोन्ही पार्वतीबाई मधील एक समान धागा म्हणजे त्यांच्यातील मातृत्वाचे भाव, देवावर अपार श्रध्दा. महाराजांची आई साकारण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच त्या पात्राविषयी अभ्यास करून काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मालिकेतून महाराजांचा विचार, त्यांचं कार्य, पोहचविण्याची संधी मला मिळाली हा त्यांचा एक मोठा आशीर्वाद असे मी मानते. म्हणूनच अतिशय मनापासून आणि जबाबदारीने या भूमिकेसाठी मी सज्ज झाली आहे”.

वेश घेतला बावळा, अंतरी शुद्ध ज्ञानकळा ऐसा सदगुरू लाघवी, नाना रंगी जन खेळवी…शंकर महाराज यांचा बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास “योगयोगेश्वर जय शंकर” या मालिकेत बघायला मिळणार आहे. तेव्हा नक्की बघा सत्पुरुषाच्या मंगल चरित्राचा आरंभ -३० मेपासून संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.