मनपा मुख्यालयात प्रजासत्ताक दिनाचा समारंभ संपन्न
क्रीडा स्पर्धा विजेते आणि कोरोना योद्धांचा सत्कार : मनपाचा चित्ररथ आणि पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा जागर
नाशिक,२६ जानेवारी २०२३ – मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आज दि. २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन समारंभ साजरा झाला. मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण झाले. तत्पूर्वी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थित सर्वांनी तंबाखू मुक्तिची शपथ घेतली. त्यांनतर मनपा क्रीडा स्पर्धेतील परीक्षक म्हणून उपायुक्त अर्चना तांबे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, डॉ. कल्पना कुटे यांचा आणि क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल समाज कल्याण विभाग उपायुक्त नितीन नेर यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर वैयक्तिक आणि सांघिक गटातील विजेत्यांना आयुक्तांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देउन सत्कार करण्यात आला. क्रीडा स्पर्धा नियोजनात विशेष सहकार्य केल्याबद्दल समीर रकटे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बांधकाम विभागातील कर्मचारी विशाल तांबोळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सीएसआर अंतर्गत विविध चौक, वाहतूक बेट, दुभाजक यांचे नूतनीकरण, सुशोभीकरण कामाकरिता केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सत्कार करण्यात आला. तसेच नंदिनी नदी संवर्धन कार्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल चंद्रकिशोर पाटील यांचा ‘पर्यावरण दूत’ म्हणून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच कोरोना योद्धा म्हणून विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट आणि सफाई कामगार भूषण उन्हवणे यांचा प्रमाणपत्र देउन सन्मान करण्यात आला. क्रीडा विभागातील कर्मचारी आनंद भालेराव, महेश आटवणे यांनी सहकार्य केले. मुख्यालयातील समारंभाला अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
विजेत्यांकडून सामाजिक बांधिलकी
क्रिकेट स्पर्धेतील प्रथम विजेता संघ वैद्यकीय आरोग्य विभाग मुख्यालय, द्वितीय संघ नाशिक रोड विभागीय कार्यालय, तृतीय संघ नाशिक रोड बिटको हॉस्पिटल आणि हॉलिबॉल स्पर्धा विजेता संघ बांधकाम विभाग या सर्व संघांनी पारितोषिकाची रोख रक्कम घारपुरे घाट येथील आधाराश्रमाला प्रदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
मनपाचा चित्ररथ आणि पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा जागर
भारतीय प्रजासत्ताक ७३ वा वर्धापन दिन मुख्य समारंभात पोलीस संचलन मैदानात यंदा मनपाचा घनकचरा व्यवस्थापन विभागाचा स्वच्छ सर्व्हेक्षणचा चित्ररथ सहभागी झाला होता. मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली या चित्ररथाद्वारे ओला, सुका कचऱ्याचे वर्गीकरण, होम कंपोस्टिंग, प्लास्टिक बंदी याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच यावेळी सादर करण्यात आलेल्या पथनाट्यद्वारे नदी प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात आली. सायक्लोन डान्स अकादमीच्या कलावंतांचा यामध्ये सहभाग होता. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी मोहित जगताप, प्रशांत ठोके यांनी सहकार्य केले.
तसेच या मुख्य संचलनामध्ये मनपाच्या शिक्षण विभागानं सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिक्षण विभाग प्रशासन प्रमुख सुनीता धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गोदा गीत सादर केले. त्याशिवाय लोकनृत्य, झेंडा नृत्य, लेझीम आणि मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांची दाद मिळवली.