१ मे ला नाशिकमध्ये रंगणार एम आर एफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार 

0

नाशिक ( प्रतिनिधी ) :  एम आर एफ मोग्रीप एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस  स्पर्धा एक मे रोजी नाशिक येथे संपन्न होत आहे . एम आर एफ मोग्रीप एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेतेपद स्पर्धेचे हे बाविसावे  वर्ष असून २०२२ सालच्या स्पर्धेतील हि पहिली फेरी आहे . तर पुढील फेरी ६ व ७ मे रोजी पुण्याला होणार आहे .

भारत सरकार व आंतरराष्ट्रीय ऑलीम्पिक संघटनेच्या मान्यताप्राप्त फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया  एफ एम एस सी आय या मोटरस्पोर्ट्स महासंघाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून या स्पर्धेचे आयोजन केले जाते .सात वर्ष राष्ट्रीय विजेतेपदाचा मान मिळवलेल्या शाम कोठारी यांच्या अधिपत्याखालील गॉड्स्पीड रेसिंग या संस्थेकडे या स्पर्धेचे सर्व अधिकार असून मागील दहा वर्षांपासून गॉडस्पीड रेसिंग या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करीत आहे .

नाशिक मधील स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची धुरा सुरज कुटे , शमीम खान ,अंकित गज्जर ,अमित वाघचौरे ,आनंद बनसोडे , मोहन पवार , गणेश लोखंडे , अमित सूर्यवंशी  व सहकारी यांनी सांभाळली असून ट्रॅक बनवण्याचे अत्यंत महत्वाचे व जिकरीचे कामही त्यांनी हाताळले आहे.सुपरक्रॉस हा कृत्रिमरित्या बनवलेल्या मार्गावर मोटारसायकल साठी घेण्यात येणारा स्पर्धा प्रकार असून या मार्गावर वाकदार वळणे व छोटे मोठे उंचवटे बनवलेले असतात . उंचवट्यावरून उंचच उंच उड्या मारत जाणारे स्पर्धक हा मोठा आकर्षणाचा भाग असतो . दिवसोंदिवस  या स्पर्धेला प्रेक्षकांच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे . प्रायोजक व प्रसिद्धी माध्यमांकडून मिळत असलेल्या भरघोस सहकार्यामुळे सर्वच प्रकारच्या मोटरस्पोर्ट्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे .

आपले कसब अजमावण्यासाठी स्पर्धकही या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होत असतात . नाशिकमध्ये होत असलेल्या या फेरीसाठी आठ गटांमध्ये विभागून तब्बल १२५ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला आहे .उत्तम संयोजक अनेक राष्ट्रीय विजेते नाशिकमध्ये तयार झालेले असल्याने मोटारस्पोर्ट्स विश्वात नाशिकचे एक वेगळेच स्थान आहे . नाशिकमधील प्रेक्षकांना देखिल स्पर्धाप्रकारातील बारकावे माहित असल्याने मैदानावर एक वेगळेच उत्साहपूर्ण वातावरण असते. या स्पर्धेसाठी एफएमएससीआय चे सत्यजित नायक , रवी शामदासांनी व समीर बुरकूल हे अधिकारी विशेष निमंत्रित असणार आहेत .

शाम कोठारी यांच्या मार्गदर्शनानुसार सुरज कुटे  व त्यांच्या सहकारी गटाने बनवलेल्या या मार्गावर १२  जम्पस , १ टेबलटॉप , व १ कट टेबलटॉप असणार आहे . तुलनात्मक रित्या बराच वेगवान ट्रॅक बनविलेला असल्याने स्पर्धकांचे कसाब पणाला लागणार असून प्रेक्षकांना मात्र येथे नेत्रदीपक स्पर्धा बघायला मिळेल . एस एक्स १ या विदेशी बनावटीच्या मोटारसायकल साठीच्या गटात अटीतटीची लढत बघायला मिळणार असून टीव्हीएस रेसिंग टीम च्या स्पर्धकांचा सहभाग या गटातील रंगात वाढवणार आहे .या स्पर्धेमध्ये ऋग्वेद बारगुजे , जितेंद्र सांगावे , ईशान शानबाग , तानिका शानबाग याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे .

मागील स्पर्धेतील स्टार ऑफ नाशिक चा विजेता हर्षल कडभाने हा एकमेव  स्थानिक स्पर्धक सहभागी होणार असून त्यांच्या कामगिरी कडे नासिककारांचे विशेष लक्ष असणार आहे . या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे खास न्यूझीलंड येथून आलेले जो डफील्ड व ऑस्ट्रेलिया येथून आलेले शॉन वेब याचे चित्तथरारक प्रात्याक्षिके होणार असून हा अनमोल क्षण नाशिककर अनुभवणार आहेत .    या स्पर्धेचे आयोजन पेठे इस्टेट , पेठे नगर , मुंबई आग्रा रोड येथे होणार असून शनिवार ३० एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजल्या पासून वाहनांची व कागदपत्रांची तपासणी होणार असून वाहन तपासणी एफ एम एस सी आय चे रवींद्र वाघचौरे हे करणार आहेत . तसेच दुपारी ३ ते ५:३० पर्यंत सराव  होणार आहे . तर मुख्य स्पर्धेला  रविवार १ मे रोजी दुपारी ३ वाजता  प्रारंभ होणार आहे .  तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या पर्वणीच लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक शाम कोठारी व सुरज कुटे यांनी केले आहे .

वृत्तपत्र छायाचित्रकारासाठी स्पर्धा 
एम आर एफ मोग्रीप या स्पर्धेत वृत्तपत्र छायाचित्रकारासाठी स्पर्धा ठेवण्यात आलेली असून दैनिकात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रासाठी पुढील प्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत . या स्पर्धेसाठी शर्ती व अटी लागू आहेत .
 प्रथम बक्षीस : रोख रु. दोन हजार
व्दितीय बक्षीस : रोख रु. एक हजार पाचशे
तृतीय  बक्षीस : रोख रु. एक  हजार
उत्तेजनार्थ बक्षीस : रोख रु . पाचशे
दैनिकात प्रसिद्ध झालेल्या फोटोसाठीच हि स्पर्धा आहे .दि ३० एप्रिल व १ मे  रोजी होणाऱ्या स्पर्धेचे  फोटो ग्राह्य धरण्यात येतील .सदर फोटोचे कात्रण व त्या बरोबर ओरिजनल फोटो प्रिंट ( साईझ ५ x ७ )  देणे आवश्यक आहे . फोटोच्या मागे छायाचित्रकाराचे नांव , पत्ता , दैनिकाचे नांव , मोबाईल नं. तसेच प्रसिद्धीची तारीख असणे आवश्यक आहे . स्पर्धा झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत  ५ मे पर्यंत   संध्याकाळी पाच वाजेपर्यंत  सदर फोटो हॉटेल एस एस के , तिडके कॉलनी , नाशिक येथे जमा करावे . उशिरा आलेल्या फोटोचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.