नासिक-मुंबई दरम्यानच्या वाहतुकीची कोंडी टळणार !
गोंदे-पिंपरी सदो सहा पदरीसह आंबे बहूला, दहावा मैल,जवळके येथील पुलांच्या कामांचेही १८ डिसेंबरला भुमीपुजन खा. गोडसे यांची माहिती
नाशिक,१४ डिसेंबर २०२२ – केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे मंत्री ना. नितीन गडकरी यांनी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण तसेच मुंबई -आग्रारोडवरील आडगाव शिवारातील दहावा मैल,जवळके फाटा तसेच नाशिक तालुक्यातील आंबेबहूला येथे बोगदे मंजुर केलेले आहेत. येत्या १८ डिसेंबर रोजी ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते वरील चारही कामांचे भुमीपूजन होणार असून आठशे साठ कोटींची कामे आहेत. यामुळे नासिक – मुंबई दरम्यानच्या वाहतुकीची कोंडी टाळणार असून खान्देशातील प्रवाशांना समृद्धी महामार्गाला सहजपणे जॉईन होता येणार असून बोगद्यामुळे अपघात टळण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून या कामांना मंजुरी मिळाली.
गोंदे फाटा ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्यावर सतत वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. पिंपरी सदो पासून समृद्धी महामार्ग हा अगदीच हाकेच्या अंतर्गत आहे. त्यामुळे नाशिक – मुंबई दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खा. हेमंत गोडसे यांचे प्रयत्न सुरू होते. नासिक – मुंबई महामार्गावरील वाहतूक टाळण्यासाठी आणि धुळे , जळगाव, नंदुरबार येथील प्रवाशांना पिंपरी सदो शिवारातील समृद्धी महामार्गावर लवकरात लवकर पोहोचण्यासाठी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण होणे किती गरजेचे आहे हे खा. गोडसे यांनी ना. नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिले होते.यातूनच मागील महिन्यात ना. गडकरी यांनी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी सातशे कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिली आहे. यापूर्वी खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून महामार्गावरील आडगाव शिवारातील दहावा मैल येथे उड्डाणपुल तर जवळके फाटा आणि आंबे बहूला जंक्शन येथे बोगदयाना मंजुरी मिळालेली आहे.
गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या वीस किलोमीटर रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामासह दहावा मैल येथील उड्डाणपुल आणि जवळके फाटा आणि आंबे बहूला जंक्शन येथील भुयारी मार्ग तथा बोगदयांच्या कामांचा शुभारंभ अठरा डिसेंबर ना. गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. पैकी गोंदे ते पिपरी सदो दरम्यानच्या रस्त्याच्या सहा पदरीकरणासाठी सातशे कोटी तर दहावा मैल चौकातील उड्डाणपूलासाठी सुमारे ४५ कोटी, जवळके फाटा येथील बोगद्यासाठी ५५ तर आंबे बहूल्यासाठी ६० कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे.