नाशिक,९ फेब्रुवारी २०२३ – नाशिक जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वारसा असलेले मंदिरे आहेत. १२ ज्योतिर्लिंगांपैकी अतिप्राचीन मंदिर म्हणून ओळख असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर (Nashik Trimbakeshwer Temple) जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. यामुळे येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात.हे मंदिर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते दरम्यान ३० जून २०२२ रोजी समाजमाध्यमांत प्रसारित झालेल्या एका व्हिडिओ मुळे पुन्हा हे मंदिर चर्चेत आले.
नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र, हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा करतानाच याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी सत्यशोधन समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली.
समाजमाध्यमांत प्रसारित झालेला व्हिडिओ
मंदिरातील मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याचे समजताच भाविकांनी हा चमत्कार पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली. मात्र नाशिक पोलिसांनी त्र्यंबकेश्वरच्या पिंडीवरील चमत्कारिक बर्फ हा खरा की खोटा याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील शिवपिंडीत बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला होता. बाबत पोलिस तपासात केला असता, या तपासामध्ये पोलिसांना एका पुजाऱ्यानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याच निष्पन्न झालंय. याप्रकरणी देवस्थान समितीने पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी त्या तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
अमरनाथ प्रमाणेच त्र्यंबकेश्वरलाही बर्फ तयार झाला असा खोटा प्रचार केल्याचा ठपका सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.