.. म्हणून नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध हटवता येणार नाही
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले कारण
नाशिक – काही दिवसपूर्वी राज्यातील १४ जिल्ह्यामधील कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी जरी झाला असला तरी जिल्ह्यात लावण्यात आलेले कोरोना निर्बंध हे आणखी काही दिवस जैसे थे ठेवण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. त्यामुळे नाशिककरांना कोरोनाच्या निर्बंधातून पूर्णपणे सुटका होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे हे नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या गोदावरी गौरव पुरस्कार प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकांराशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आता नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अद्यापही अनेक नागरिकांचे लसीकरण बाकी असल्याने आताच निर्बंध शिथिल करता येणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नाशिक शहराची लसीकरणाची आकडेवारी चांगली असली तरी मालेगाव आणि इतर ग्रामीण भागात अद्यापही लसीकरण अत्यल्प प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाशिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक शहरात लसीकरणाचे प्रमाण हे ९० टक्क्यांवर आहे तर ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण हे ६० टक्क्यांवर असून मालेगाव येथे हेच प्रमाण अत्यंत कमी म्हणजे जवळपास ४० टक्के असल्याने नाशिक जिल्ह्यातील कोरोना निर्बंध हे अद्याप तरी पूर्णपणे हटविले जाणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हंटल आहे. तर ज्या ज्या भागात लसीकरणाच प्रमाण कमी आहे. त्या ठिकाणच्या जास्तीत जास्त नागरिकांनी आपले लसीकरण करू घ्यावे असे आवाहन देखील टोपे यांनी केले आहे. याबाबत कॅबिनेट मध्ये झालेल्या बैठकीत देखील चर्चा झाली असल्याचे मंत्री टोपे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हंटलं आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये झिरो झिरो अशा पद्धतीचं नवीन रुग्णांचे निदान होण्याचं प्रमाण आहे. या अनुषंगाने आता फक्त जो पॅरामिटर राहिला आहे त्याच्या अनुषंगाने निर्बंध हटवायचे ते म्हणजे व्हॅक्सिनेशन आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक जोर देण्याचं काम त्या त्या जिल्ह्याच्या प्रशासनाने केले पाहिजे, हा आग्रह मुख्यमंत्र्यांचा आहे. लसीकरण कार्यक्रम चालू असायलाच हवा, त्यात दुसरा विचार नाही किंवा दुमत असण्याचं कारणच नाही, त्यामुळे लवकर हे सर्व खुल होईल, अशी आशावादी भूमिका आम्ही घेतली असून याबाबत मुख्यमंत्री लवकरच सकारात्मक निर्णय देतील असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.