सर्व शासकीय व खाजगी आश्रमाची सखोल चौकशी करा – अंबादास खैरे
महिला व बालविकास मंत्र्यांना पाठविले निवेदन
नाशिक,दि.२ डिसेंबर २०२२ –नाशिक मधील आधार आश्रमात घडलेल्या घटनांवरुन संतापाची भावना पसरली असल्याने असे प्रकरण पुन्हा घडू नये म्हणून आता सर्व शासकीय व खाजगी अनाथ आश्रम व आधार आश्रमाची सखोल चौकशीचे आदेश देण्यात यावे असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना पाठविले आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या नावाने चालणाऱ्या आधारतीर्थ आधाराश्रमात चार वर्षीय बालकाचा खून व नाशिकमधीलच ज्ञानदीप गुरुकुल या खासगी अनाथाश्रमातील सहा विद्यार्थिनींचा लैंगिक छळ असे दोन गुन्हे लागोपाठ घडले आहेत. ज्ञानदीप गुरुकुल अनाथाश्रमातील मुलींना पॉर्न फिल्म दाखवत, त्यांचे अंघोळीचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करीत संस्थेतच त्यांच्यावर अत्याचार करण्याचा गंभीर गुन्हा घडला आहे. समवेत पारायणाच्या नावाखाली बाहेरगावी नेऊनही त्यांचे शोषण केले. आश्रमातील तेरापैकी सहा मुलींवर हातपाय दाबण्यासह इतर बहाण्याने अंगलट करून लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर प्रकरणाबाबत चौकशी समिती नेमण्यात आली असून सदरची समिती फक्त या एकाच आश्रमाची चौकशी करणार आहे. परंतु नाशिकमध्ये नोंदणीकृत व अनोंदणीकृत अनेक संस्था असून यांच्यामार्फत गरीब, असहाय व निराश्रित मुलींना मोफत शिक्षण व राहण्याच्या व्यवस्था करून आधार आश्रम चालविले जातात. महिला बाल विकास विभाग, बालकल्याण समिती, बाल संरक्षण कक्ष, अपंग कल्याण या प्रमुख संस्थांच्या परवानगी शिवाय सदरच्या खासगी संस्था आधाराश्रम, अनाथाश्रम, बालगृहे आपला कारभार चालवत आहेत. असे असताना एकही शासकीय विभाग वा जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्याशी संबंधित कोणतीही सविस्तर माहिती उपलब्ध नाही.
नाशिक मधील सर्वच अधिकृत व अनधिकृत संस्थांची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी समिती नेमून त्यांच्या माध्यमातून सर्वच खाजगी आश्रमाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.