महिलांना आरोग्य व अर्थ नियोजनाच्या टिप्स : जितो महिला विंगचा अभिनव उपक्रम
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ.श्रुती काटे, अभिनेत्री निर्मला कोटणीस यांच्याकडून महिलांना आरोग्य, अर्थकारण व तणावमुक्त आयुष्याविषयी मार्गदर्शन
महिलांनी आर्थिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनावे – निर्मला कोटणीस(अभिनेत्री तथा पदुकोण स्पोर्ट्सच्या ऑपरेशनल हेड)
नाशिक,दि.७ मार्च २०२३ – लहान वयापासून कॅन्सरचे प्रमाण अधिक वाढत असून मानवी आरोग्याच्या दृष्टीने हा विषय अतिशय चिंतेचा आहे. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी महिलांनी सकाळचा एक तास व्यायामासाठी द्यावा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कॅन्सर व केमोथेरपीतज्ञ डॉ.श्रुती काटे यांनी केले. तर महिलांना मिळालेल्या संधीचे सोनं करत आर्थिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनावे असे प्रतिपादन अभिनेत्री तथा पदुकोण स्पोर्ट्सच्या ऑपरेशनल हेड निर्मला कोटणीस यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जितो महिला विंगच्या पदाधिकारी मोनालिसा जैन यांच्याकडून मानवता क्युरी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य व अर्थनियोजन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित सोहळ्याप्रसंगी मनोगत व्यक्त डॉ.श्रुती काटे व अभिनेत्री निर्मला कोटणीस बोलत होत्या.
महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करतांना डॉ.श्रुती काटे म्हणाल्या की, व्यवनाधिनता, चुकीच्या आहार सवयी तसेच आरोग्याची काळजी न घेतल्याने दिवसेंदिवस कॅन्सरचे प्रमाण अधिक वाढत आहे. यामध्ये चिंतेची बाब म्हणजे बालवयात कॅन्सरचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनीच दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. महिलांनी वयाच्या ४० वर्षानंतर नियमित विविध वैद्यकीय चाचण्या कराव्यात. तसेच योग्य सकस आहार घेऊन रोज सकाळी एक तास व्यायामासाठी देऊन निरोगी व तणावमुक्त,सकारात्मक आयुष्य जगावे असे आवाहन केले.
यावेळी अभिनेत्री तथा पदुकोण स्पोर्ट्सच्या ऑपरेशनल हेड निर्मला कोटणीस यांनी तणावमुक्त आयुष्य जगण्यासोबत महिलांना अर्थ नियोजनाच्या टीप्स दिल्या. त्या म्हणाल्या की, महिलांनी स्वतः सक्षम होऊन आपल्या कुटुंबासाठी योग्य आर्थिक नियोजन करून आत्मनिर्भर व्हावे. तणावमुक्त आयुष्य जगावे. आयुष्यात येणाऱ्या विविध संधी न सोडता त्या स्वीकारून संधीच सोन करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जितो महिला विंगच्या अध्यक्षा कल्पना पाटणी, सेक्रेटरी वैशाली जैन, कार्यक्रमाच्या आयोजक मोनालिसा जैन, सह आयोजिका रिंकू कासलीवाल, सरला पाटणी, अपर्णा शाह, सुवर्णा काला, वंदना ताथेड, संगीता लोढा, दक्षा बोहरा, सपना पहाडे, श्रद्धा कटारिया, रंजना शहा यांच्यासह महिला व मान्यवर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला सशक्तीकरणाबाबत नुपूर ठाकूर डान्स ॲकडमीच्या शालेय मुलींनी नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनालिसा जैन यांनी केले.