नाशिक – नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची बदली झाली असून नाशिकचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयात उपसचिव पदावर कार्यरत असलेले १९९३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी गंगाधरन देवराजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सध्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची पुणे येथील शिक्षण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, गंगाधरन देवराजन हे नवे जिल्हाधिकारी पदभार कधी स्वीकारतील याबाबत अद्याप निश्चितता नाही.नाशिकमध्ये कोरोना काळात प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या संयमी नेतृत्वामुळे करोना नियंत्रणात आणण्यास मोठा हातभार लागला होता.सुरज मांढरे यांची मार्च २०१९ मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होऊन बरोबर ३ वर्ष उलटताच त्यांची बदली करण्यात आली आहे.
सुरज मांढरे हे नाशिकमध्ये एक उत्तम प्रशासकीय अधिकारी होतेच परंतु त्यांनी सामाजिक कार्यात देखील मोठा हातभार लावला आहे. ज्याप्रमाणे पुण्यात त्यांनी मुलांना शासकीय अधिकाऱ्यांमार्फत मदत करण्याचा उपक्रम राबविला होता. तेच कार्य पुढे नेतांना त्यांनी नाशिकमध्येही मदतदूत बनत अन्य ४० प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मदतीने कोरोनाने मृत्यू झालेल्या ५८ मुलामुलींना दत्तक घेण्याची योजना राबविली. त्यात सहभागी प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्या मुलांच्या भेटीगाठी, त्यांना मदत, संपर्क करून पाच लाखांची शासकीय मदत, शैक्षणिक खर्चाव्यतिरिक्त अन्य जबाबदारी घेतली. याशिवाय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वत: जुळ्या मुलींची जबाबदारी घेतली.
याशिवाय कोविड काळात पोषण आहार अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याने नाशिक जिल्हा परिषदेस राज्य स्तरावर तिसरा क्रमांक मिळाला आहे. या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी यांना विशेष पुरस्कार, जिल्ह्याला पोषण अभियानातील कामाबाबत पुरस्कार तर शहरी एकात्मिक बालविकास प्रकल्पाला पुरस्कार असे तीन पुरस्कार मिळवून नाशिक हा सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा जिल्हा म्हणून जिल्ह्याला बहुमान मिळाला. असे विविध उपक्रम राबविणाऱ्या जिल्हाधिकारी अजून काही दिवस नाशिकच्या विकासासाठी हवे असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी या निमित्ताने व्यक्त केली आहे.