अनुवाद ही आनंद देणारी प्रक्रिया

0

नाशिक,१९ डिसेंबर २०२२ – अनुवाद ही प्रक्रिया सर्जनशीलतेचा नवा रूपबंध असते. अनुवाद करणारा मूळ कलाकृतीला आपल्या जाणिवेत ठसवून घेतो. मूळ कलाकृतीचा आशय, अभिव्यक्ती याचा सांगोपांग विचार करतो. शब्दांच्या अर्थछटा समजून घेत वांग्मय प्रकारानुसार ती आपल्या भाषेत आणत असतो; त्यामुळे अनुवादाची प्रक्रिया ही अनुवादकाला अधिकाधिक आनंद मिळवून देते, असा सूर पुण्यातील ‘अक्षरधारा’च्या कुसुमाग्रज कट्ट्यावर झालेल्या अनौपचारिक गप्पांमधून प्रकट झाला. निमित्त होते  ‘शब्दमल्हार’ प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या वर्षा गजेंद्रगडकर यांच्या ‘ते हृदयीचे ये हृदयी’ या अनुवादित कथासंग्रहाच्या प्रकाशनाचे. या कार्यक्रमासाठी पुस्तकाच्या अनुवादक वर्षा गजेंद्रगडकर यांच्यासह ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी, डॉ. अरुणा ढेरे, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, भारती पांडे, सुप्रिया सहस्त्रबुद्धे आणि ‘शब्दमल्हार’चे संपादक स्वानंद बेदरकर उपस्थित होते.

ज्या भाषेतून साहित्यकृती अनुवादिली जाते आणि ज्या भाषेत आणली जाते अशा दोन्ही भाषा संस्कृतीची जाण आणि भान अनुवादकाला पूर्णपणे असले पाहिजे असे सांगत उमा कुलकर्णी यांनी कन्नड साहित्य मराठीत आणताना कराव्या लागणाऱ्या अनेकविध अभ्यास प्रक्रियांचा उल्लेख केला. अनुवाद हे नवे सर्जनच असते असेही मत त्यांनी मांडले.

अनुवादकाला एकेका शब्दासाठी झगडावे लागते; कारण मूळ कलाकृतीतला आशय आणि त्या आशयाला पुढे नेणारा शब्द फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे ही सांगड अनुवादकाला घालता यायला हवी; असे मत भारती पांडे यांनी व्यक्त केले.

सुप्रिया सहस्त्रबुद्दे म्हणाल्या, मूळ कलाकृतीतील लय अनुवादित कलाकृतीमध्ये आल्यास अनुवाद अधिक सरस होतो. डॉ. अरुणा ढेरे यांनी जर्मन कवयित्रींच्या कवितांचे मराठी अनुवाद करताना किंवा ‘राजतरंगिणी’चा अनुवाद करताना आलेल्या अनुभवाचे कथन करीत लोकभाषा, प्रमाणभाषा आणि अनुवाद प्रक्रियेसाठी असणारी समोरची भाषा यातले अंतसूत्र अनुवादात प्रकट व्हायला हवे असे सांगितले.

मिलिंद जोशी यांनी या गप्पांचा समारोप करताना नव्या पिढीमध्ये अनुवादाच्या वाचनाबद्दलची असलेली सजगता उपस्थितांपुढे मांडली. यामुळे अनुवाद करणाऱ्या पुढील आव्हान वाढते आहे असेही ते म्हणाले.स्वानंद बेदरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत ‘शब्दमल्हार’ने केलेल्या अनुवादाचा प्रवास मांडला.

यावेळी ‘शब्दमल्हार’ ने प्रसिद्ध केलेल्या २०२३ च्या ‘वाग्विलासिनी’ या दिनदर्शिकाचेही प्रकाशन झाले.मराठीतील प्रातिनिधिक बारा कवयित्रींची रेखाटने आणि त्याशेजारी त्यांची एक कविता असे या दिनदर्शिकेचे स्वरूप आहे.यातील रेखाटने करणारे चित्रकार तुषार देसाई, अक्षय पाटील हेही यावेळी उपस्थित होते. माधवी भट यांनी दिनदर्शिकेतील कवितांची निवड केली असून कविताप्रेमींसाठी ही एक पर्वणी असल्याचे मिलिंद जोशी म्हणाले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!