त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी ११ लाखांची देणगी

0

नाशिक, दि. २७ ऑक्टोबर २०२५ Trimbakeshwar Temple Trust धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम दाखवत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने पुन्हा एकदा आपली सामाजिक जबाबदारी जपली आहे. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे(Trimbakeshwar Temple Trust)मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. ही देणगी ओझर विमानतळावर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात देण्यात आली.

या प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, देवस्थानचे सचिव व नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, तसेच देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले, रुपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार, मनोज थेटे, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, प्रदीप तुंगार, विशेष कार्य अधिकारी अमित टोकेकर, लेखापाल प्रणव पिंगळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी देवस्थानच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “त्र्यंबकेश्वर देवस्थानने धार्मिक सेवेसोबतच समाजासाठी सतत योगदान देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या रकमेचा उपयोग राज्यातील विविध सामाजिक आणि आपत्तीग्रस्त भागातील मदतीसाठी करण्यात येईल.” त्यांनी देवस्थान विश्वस्त व भाविकांचे विशेष आभार मानले.

देवस्थानचे सचिव राहुल पाटील यांनी सांगितले की, “त्र्यंबकेश्वर हे केवळ धार्मिक तीर्थक्षेत्र नसून सामाजिक सेवेतही आघाडीवर आहे. भाविकांच्या देणगीतून मिळालेल्या निधीचा काही भाग दरवर्षी समाजोपयोगी कार्यांसाठी राखून ठेवला जातो. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला ही देणगी देण्यात आली आहे.”

दरवर्षी देशभरातून लाखो भाविक भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येतात. त्यामधून देवस्थानला मिळणाऱ्या निधीचा काही भाग शिक्षण, आरोग्य, आणि आपत्तीग्रस्तांसाठी वापरण्याची परंपरा ट्रस्टने वर्षानुवर्षे जपली आहे. यापूर्वीही पूर, दुष्काळ, आणि महामारीच्या काळात देवस्थानने मुख्यमंत्री राहत निधीला लाखो रुपयांची मदत केली होती.

विश्वस्त मंडळातील सदस्यांनी सांगितले की, “देवस्थान ट्रस्टचा उद्देश केवळ धार्मिक व्यवस्थापनापुरता मर्यादित नाही. समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे, पर्यावरण संवर्धन, तीर्थक्षेत्र विकास, आणि आरोग्यसेवा यासाठीही आम्ही कटिबद्ध आहोत.”

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र स्थळ आहे. भगवान त्र्यंबकेश्वराचे मंदिर महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानले जाते. येथे दरवर्षी श्रावण महोत्सव, महाशिवरात्री, आणि कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. देवस्थानकडून या भाविकांच्या सुविधांसाठी विविध विकासकामे केली जात आहेत.

या देणगीमुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की, धार्मिक संस्थाही समाजाच्या कल्याणासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. धर्म आणि दायित्वाचा हा सुंदर मिलाफ राज्यासाठी प्रेरणादायी ठरतो आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!