शेगाव संस्थानचे विश्वस्थ शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधन

0

शेगाव – समर्पित वृत्तीने व प्रामाणिकपणे श्री गजानन महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासणारे श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे आज(बुधवार) दुपारी ५ वाजता निधन झाले.ते ८२ वर्षांचे होते.

मागील तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. मात्र, त्यांनी ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका’ असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्यावर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या देखरेखीखाली उपाचार सुरू होते.त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे व मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत होईल, असं कळवण्यात आलेलं आहे.

गजानन महाराज संस्थानाचे शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांना शोक

शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानाचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तीमंत रुप काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे शोक संदेशात म्हणतात, श्री. संत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गोरगरिब आणि वंचितांची सेवाही केली. त्यांच्या निस्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील असे पण सत्य आहेत.

श्री. गजानन महाराज संस्थानाची कारभाराचे नियोजन, व्यवस्थापन हा जगभरातील तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहीला आहे. त्यांच्या निधनाने सेवा कार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेला आहे.

शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दु:ख

शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबददल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

संत गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त श्री. शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजून दु:ख झाले. विनम्र स्वभाव व नि:स्वार्थ सेवेकरिता परिचित असलेले शिवशंकर भाऊ पाटील यांनी उत्तम मंदिर व्यवस्थापनाचा वस्तुपाठ समाजापुढे ठेवला. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.