१ कोटीची लाच घेतांना एमआयडीसीचे दोन अधिकारी ACB च्या जाळ्यात

ACB सर्वात मोठी कारवाई 

0

अहमदनगर,दि,४ नोहेंबर २०२३-नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली आहे. या संदर्भात रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली होती. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने नगर शहराजवळ सापळा रचून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अहमदनगर उपविभागाच्या सहा.अभियंता अमित गायकवाड (वय 32 रा.प्लॉट नं 2 आनंदविहार नागापुर,अहमदनगर, मुळ रा. चिंचोली ता.राहुरी) यास एक कोटी रुपयांची लाच घेताना अटक केली आहे अशी माहिती नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वाल वलकर यांनी दिली आहे या प्रकरणांमध्ये तत्कालीन अभियंता गणेश वाघ यांचा देखील ५०% वाटा होता अशी कबुली अटकेत असलेल्या अमित गायकवाड यांनी दिली आहे

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर अधीक्षक वालावलकर यांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत १०० एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे २ कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रूपयांचे बिल मिळावे म्हणून सदर बिलांवरती तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेवुन सदरचे देयक पाठविण्याचे मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्या करीता या बिलाचे कामाचे व यापुर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणुन एक कोटी रूपये लाचेची मागणी करून लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. तशी तक्रार शासकीय ठेकेदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

नाशिक पथकाने शुक्रवारी दुपारी नगर – संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात आनंद सुपर मार्केट बिंल्डिंगच्या बाजुला सापळा लावला. त्यावेळी मागणी केलेली लाचेची एक कोटी रूपयांची रक्कम गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरीता एका इनोव्हा कारमध्ये पंच, साक्षीदारांसमक्ष स्विकारली आहे. त्याचवेळी गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन वाघ याला फोन करून लाचेची रक्कमेबाबत माहिती दिली व त्याच्या हिस्स्याची ५० टक्के कोठे पोहचवावी बाबत विचारले असता वाघ याने सांगीतले की,’राहु दे तुझ्याकडे बोलतो मी तुला ते तुलाच पोहचवायचे आहे एका ठिकाणी, सांगतो नंतर सध्या तुझ्या सेफ कस्टडीमध्ये ठेवुन दे’ असे म्हणुन वाघ याने गायकवाड याच्या लाच मागणीस व स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे सांगण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.