नाशिक,दि,२२ जानेवारी २०२४ – दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आलेले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नाशिकमधून करण्याचा निर्धार केला आहे.त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन तेथे सह कुटुंब विधिवत पूजा हि केली त्यानंतर त्यांच्या हस्ते हस्ते रामकुंड येथे गंगा गोदावरीची महाआरती करण्यात आली.
आज सोमवारी (दि. २२ जानेवारी) दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सायंकाळी काळाराम मंदिरात आपल्या कुटुंबासह दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती करण्यात आली.
त्यानंतर उद्धव ठाकरे हे नाशिक येथील रामकुंड परिसरात दाखल झाले. त्यांनी रामकुंडावर गोदावरीची आरती केली. यावेळी उद्धव ठाकरेंना पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी कडेकोट नियोजन केले होते. उद्धव ठाकरे रामकुंडावर दाखल होताच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.उद्धव ठाकरे यांनी भगवे कपडे परिधान केले होते. तसेच त्यांनी गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. या पोशाखाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
गंगा गोदावरीच्या महाआरती प्रसंगी वेळी लहान मुलांनी राम, लक्ष्मण, सीता यांची वेशभूषा धारण केली होती तसेच तरुणांच्या पथकाकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. गोदा काठावरील आरतीनंतर येथे दिवे लावण्यात आले होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत,अंबादास दानवे,खा.अरविंद सावंत,सुभाष देसाई,अजय चौधरी. यांच्यासह ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोदाकाठावर ठाकरे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. गोदाकाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सर्वत्र उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे अनेक बॅनर्स लावले होते. देशभरामध्ये प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा निमित्त उत्साह आहे. त्यात नाशिकमध्ये देखील असाच उत्साह पाहायला मिळाला.