मुंबई,दि,३१ जुलै २०२४ –लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर मविआतील तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास चांगलाच वाढल आहे. तसेच मविआतील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाकडून मुंबईतील रंग शारदा येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्र सोडले. ‘शिवसेनेला व ठाकरे कुटुंबीयांना अनेक प्रकारे त्रास दिला जातोय. मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीसने डाव रचले होते हे स्वत: अनिल देशमुखांनी सांगितलं. हे सगळं सहन करून मी हिंमतीनं उभा राहिलो. आता एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन,’ असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. मागच्या काही वर्षांत शिवसेनेसोबत झालेल्या कुटील राजकारणाचा पाढा त्यांनी वाचला. तसंच, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी एकेरी भाषेत जोरदार टीका केली.आज माझ्याकडे पक्ष चिन्ह, पैसा काहीच नाही. पण शिवसैनिकांच्या हिंमतीवर मी आव्हान देत आहे, असे ठाकरेंनी म्हटले.
‘कुरुक्षेत्रावर नातेवाईकांना समोर पाहून अर्जुनाला वाईट वाटलं. कालपर्यंत माझ्यासोबत असलेले माझ्या घरावर चालून येतायत हे पाहून मला यातना होत नसतील? पण मी एका तडफेनं उभा राहिलेलो आहे. माझ्याकडं अधिकृत पक्ष नाही, चिन्ह नाही. पैसा नाही. पण मी केवळ शिवसैनिकांच्या बळावर आवाज देऊ शकतो. मी म्हणजे शिवसैनिक आहेत. दिल्लीच्या उरात धडकी माझ्या शिवसैनिकांमुळं भरली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं. ‘लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला आता विधानसभा निवडणुकीत भाजपाची उरली सुरली गुरमी उतरवू,असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
ते पुढे म्हणाले ग्रामीण भागामध्ये चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला. काही जणांनी सांगितले की आम्हाला मतदान करणार होते पण चुकून त्यांना दिले. मशाल चिन्ह घरोघरी पोहोचली पाहिजेत. जायचं आहे तर उघडपणे जा आणि आत राहून दगाबाजी करु नका. शिवसैनिकांना सोबत घेऊन लढून जिंकून दाखवीन, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.पुढे बोलतांना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते मला भेटून गेले आहेत.अनेकजण म्हणाले की, उद्धवजी आपने देश को दिशा दिखाई है. मी म्हणालो, जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसं आहेत. अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.