उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन,कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
काळाराम मंदिराचे घेणार दर्शन:रामकुंडावर गंगा पूजन करणार
नाशिक,दि, २२ जानेवारी २०२४ – उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन झाले आहे. उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. नाशिक विमानतळावर त्यांचे ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार संजय राऊत यांच्यासह नाशिकमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आगमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत.
त्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली.प्रांगणातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.उध्दव ठाकरे यांचे ओझर विमानतळ ते भगूर दरम्यान अनेक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली. २५ फुटांचे हार घालण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज अयोद्धेत प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय. ठाकरे गट आज काळाराम मंदिरात श्रीरामाची पूजा आणि महाआरती करेल.उद्या अधिवेशन होणार आहे.आज सायंकाळी काळाराम मंदिर आणि गोदा आरतीला जातील, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत दिली आहे.
उद्या दि. २३ जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तर उद्या सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होईल. उद्धव ठाकरे जाहीर सभेत कुणावर तोफ डागणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.