विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधकांमध्ये अभूतपूर्व राडा

(व्हिडीओ पहा )

0

मुंबई २४ ऑगस्ट  – राज्याचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाच्या आज पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अभूतपूर्व राडा  झाला  गेल्या चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबरी घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे आज सकाळपासून भाजपचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते.

सत्ताधारी-विरोधका आमने-सामने आणि राडा झाला. कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, वाझेचे खोके- मातोश्री ओके, लवासाचे खोके-बारामती ओके, अशा घोषणा सत्ताधारी पक्षाने दिल्या. तर ‘५० खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके!’ ‘गाजर देणे बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा’, अशा गगनभेदी घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

हे सर्व  सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूचे आमदार आक्रमक असल्यामुळे बाचाबाचीचा प्रकार घडला.सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले व त्यांच्यात धक्काबुक्कीही झाल्याचे दिसून आले. शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात प्रचंड गदारोळ माजला होता. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्ये पडत विरोधी पक्षाच्या आमदारांना बाजूला नेले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. डरपोक आहोत काय ? असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. शिंदे गटातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या नादी लागू नका असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. हा फक्त ट्रेलर होता अजून अख्खा सिनेमा बाकी आहे.

विरोधकांनी ५० खोके एकदम ओके म्हणत शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा गेले काही दिवस प्रयत्न केला होता. त्यानंतर या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिंदे गटातील आमदार विधीमंडळ्याच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.