मुंबई,दि,१ मे २०२५ – Upcoming Marathi Movies 2025 हृषीकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित ‘जारण’ (Jaaran)या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटातील कलाकारांचे पोस्टर्स एकामागून एक प्रेक्षकांसमोर येत असून, प्रत्येक पोस्टरसोबत चित्रपटातील रहस्य अधिकच गडद होत चाललं आहे. अमृता सुभाष, अवनी जोशी, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड, किशोर कदम, ज्योती मालशे यांच्यानंतर आता अभिनेत्री अनिता दातेचे भयावह रूप प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून ‘जारण’ या मराठी सिनेमाची सर्वत्र चर्चा होतेय. हा चित्रपट जून २०२५ मध्ये जरी येणार असले ‘तेरी नुकतंच सिनेमाचं पहिलं पोस्टरही समोर आलं होतं. डोळ्यांत दडलेली कहाणी, चेहऱ्यावर टोचलेल्या टाचण्या आणि मनात खोलवर रुतलेलं एक अनामिक गूढ… या अवतारात अभिनेत्री अमृता सुभाष प्रेक्षकांच्या समोर आली होती. हे ‘जारण’ सिनेमाचं पोस्टर पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. आपल्या बिनधास्त अभिनयशैलीसाठी ओळखली जाणारी अमृता यावेळी रहस्यमय व्यक्तिरेखेत दिसणार आहे. तर सिनेमात आणखी अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार आहे. ही अभिनेत्री आहे अनिता दाते केळकर. चित्रपटाचं दुसरं पोस्टरही समोर आलं आहे. अनिता दाते केळकर ही तुंबड भयपटानंतर पहिल्यांदाच अशा हटके लुकमध्ये दिसत आहे.
सोशल मीडियावर नुकतेच (Upcoming Marathi Movies 2025) अनिता दातेचे ‘जारण’ (Jaaran)मधील पोस्टर झळकले असून तिच्या अतीव तीव्र आणि रहस्यमय लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. चेहऱ्यावर असलेल्या टाचण्यांमुळे आणि डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावनांमुळे ही भूमिका खूपच गूढ आणि परिणामकारक वाटते. या रूपामागे काही गंभीर सत्य दडले आहे का? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
या भूमिकेबद्दल अनिता दाते म्हणते, “हृषीकेश गुप्ते यांची एक कथा वाचल्यावर त्यावर चित्रपट बनवायचे ठरले आणि मी त्या कथेचा भाग नव्हते, याचे दुःख वाटले. पण लगेचच निर्माते अमोल भगत यांचा फोन आला आणि त्यांनी ‘जारण’ मधील एक महत्वपूर्ण भूमिका मला दिली. ती भूमिका अनेक पदरांनी सजलेली असून, तिला योग्य न्याय देण्यासाठी मी सर्वस्व झोकून दिले.”
अनिता दातेने आजवर अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र ‘जारण’ मधील ही भूमिका तिच्या कारकिर्दीतील एक वेगळीच ओळख ठरू शकते, असे संकेत तिच्या लूकवरून मिळत आहेत.
ए अँड एन सिनेमाज एलएलपी आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस प्रॉडक्शन प्रस्तुत ‘जारण’ हा चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.