मुंबई, दि. ३१ ऑगस्ट २०२५ – Vadapav Marathi Movie मराठी प्रेक्षकांच्या मनात कायम स्थान मिळवणारे अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक आपला शंभरावा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे या टप्प्यावर ते ‘वडापाव’ या नव्या चित्रपटात दिग्दर्शक आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका पार पाडताना दिसणार आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून हा चित्रपट एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी प्रेक्षकांसमोर आणणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
टीझरमध्ये धमाल आणि गोडवा (Vadapav Marathi Movie)
‘वडापाव’चा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जसा वडा चुरचुरीत, तिखट आणि रुचकर असतो तसंच नात्यांमधील गोडवा आणि तिखटपणा या कथेच्या गाभ्यात आहे. दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, “ही कथा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आपलीशी वाटेल. कुटुंब, त्यांचे नातेसंबंध आणि त्यातला भावनिक व विनोदी अनुभव प्रत्येकाला भिडणार आहे.”
कलाकारांची दमदार फळी
या चित्रपटात प्रसाद ओक यांच्यासोबतच अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांसारखे दमदार कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे चित्रपटाची रंगत अधिकच वाढणार आहे.
निर्मिती आणि तांत्रिक बाजू
‘वडापाव’ चित्रपटाची निर्मिती एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट या संस्थांनी केली आहे. सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत. संजय मेमाणे यांनी छायांकन तर सिद्धार्थ साळवी यांनी कथा लेखन केलं आहे.निर्माते अमेय खोपकर म्हणतात, “मराठी प्रेक्षकांना नेहमीच कौटुंबिक चित्रपट आवडतात. ‘वडापाव’ त्यांच्या मनात नात्यांची खरी चव रुजवेल.”तर निर्माते निनाद बत्तीन यांच्यानुसार, “हा चित्रपट तीन पिढ्यांची कहाणी सांगतो आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा आहे.”
निर्माते अमित बस्नेत म्हणाले, “मी मुळात नेपाळचा असून मराठी संस्कृती, खाद्यपदार्थ आणि कलांबद्दल नेहमीच आकर्षण वाटतं. ‘लंडन मिसळ’नंतर आता ‘वडापाव’ची निर्मिती करताना विशेष आनंद आहे. वडापावसारखीच ही कथा घराघरांतली, ओळखीची तरीही नव्या चवीची आहे.”
शतकपूर्तीचा टप्पा
हा चित्रपट प्रसाद ओक यांच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट असल्यामुळे अधिकच संस्मरणीय ठरणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आजवर विविध भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक यांचा हा प्रवास ‘वडापाव’मुळे एक वेगळी उंची गाठणार आहे.‘वडापाव’ हा केवळ खाद्यपदार्थावर आधारित शीर्षक नसून कुटुंबीय नातेसंबंधातील गोडवा व तिखटपणाचं प्रतीक आहे. धमाल, भावनिकता आणि कौटुंबिक मूल्यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खरी मेजवानी ठरणार आहे.