पुणे,२६ नोव्हेंबर २०२२ – मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठअभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यात निधन झाले आहे वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.विक्रम गोखले यांच्यावर ५ नोव्हेंबर पासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.२३ तारखेला दुपारी ते कोमात गेले आणि त्यानंतर त्यांनी स्पर्शाला प्रतिसाद दिला नाही.त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली पण पुन्हा तब्येत बिघडली. त्यांना हृदय आणि मूत्रपिंडासारख्या अनेक समस्या होत्या. या क्षणी त्यांचे विविध अवयव निकामी झाले आहेत.’आणि त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देणं ही थांबवले होते.
अखेर आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १५ दिवसांपासून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले, आज सायंकाळी ६ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठी सह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४७ रोजी पुण्यात झाला होता. विक्रम गोखले यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक या सर्व माध्यमात काम केले होते. ते चित्रपटांबरोबरच रंगभूमीवर सुद्धा अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. विक्रम गोखले यांना अभिनयाचे धडे कुटुंबातच मिळाले होते.विक्रम गोखले यांच्या वडिलांपासून ते आजी आजोबापर्यंत संपूर्ण कुटुंबच चित्रपटसृष्टीत कार्यरत होत. विक्रम गोखले यांच्या कुटुंबाचा मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीशी देखील दीर्घकाळ संबंध आहे. विक्रम गोखले यांच्या आजी हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या भारतीय कलाकार होत्या. इतकेच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके दिग्दर्शित चित्रपटात त्यांच्या आजीने हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण केल्याचेही माहिती आहे. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनीही ७० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
विक्रम गोखले यांचं चित्रपटसृष्टीतील योगदान मोलाचं आहे. त्यांचं मराठीप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतही मोठं नाव होतं. विक्रम गोखले यांनी १९७१ साली अमिताभ बच्चन यांच्या ‘परवाना’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपला प्रवास सुरू केला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली होती.’परवाना’ या चित्रपटानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अशा अनेक व्यक्तिरेखा साकारल्या, ज्या संस्मरणीय ठरल्या. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात साकारलेली ऐश्वर्याच्या वडिलांची व्यक्तिरेखा रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. या चित्रपटात त्यांनी संगीतकाराची भूमिका साकारली होती.याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अशा दमदार भूमिका केल्या आहेत, ज्यांना प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी भूल भुलैया, मिशन मंगल, दिल से, दे दना दान, हिचकी, निकम, अग्निपथ, विक्रम बेताल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले.विक्रम गोखले यांना २०१३ मध्ये अनुमती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याबरोबरच त्यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. तसेच २०१७ मध्ये हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, २०१८ मध्ये पुलोत्सव सन्मानाने गौरवण्यात आले होते. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारानाही सन्मानित करण्यात आले होते.
मराठी चित्रपटसृष्टीत ‘गोदावरी’ हा चित्रपट तर ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील गुरुंजींची भूमिका अखेरची ठरली आहे. विक्रम गोखले अभिनयाबरोबरच अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर सातत्यानं भाष्य करत असतात. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. अभिनय क्षेत्रात विक्रम गोखले यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. माहेरची साडी सिनेमातील त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखलेंचं मोलाचं योगदान आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.