मुंबई,दि. १३ डिसेंबर २०२३ –ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे.गेल्या काही काळापासून ते घशाच्या कर्करोगाने ग्रस्त होते.रविंद्र बेर्डे यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मराठी सिनेसृष्टीत रविंद्र बेर्डे यांनी आपल्या भूमिकेने वेगळी ओळख निर्माण केली होती.दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. वयाच्या विसाव्या वर्षी नभोवाणीशी आणि १९६५ च्या काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली होती.
दोन दिवसांपूर्वीच रवींद्र बेर्डे यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.धमाल बाबल्या गणप्याची, चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, अष्टरूप जय वैभवलक्ष्मी माता, होऊन जाउदे, खतरनाक, हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, बकाल, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.या मराठी सिनेमांसोबत त्यांनी सिंघम सारख्या सुपरहिट हिंदी सिनेमातही अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.चाहतेही सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.