मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं मुंबईत आज पहाटे (१ मे २०२२) हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झालं आहे.त्या 61 वर्षांच्या होत्या. अनेक मराठी चित्रपटात विविध भूमीका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होते. ८०ते ९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत त्यांचे चाहते आणि निकटवर्तीयांना मोठा धक्का बसला आहे.
अनेक मराठीतील चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे , अशोक सराफ यांसारख्या कलाकारांसोबत काम करून त्यांनी सगळ्यांचे मनोरंजन केले आहे.‘धुम धडाका’,‘पागलपन’,अर्जुन देवा, कुंकू झाले वैरी,लग्नाची वरात लंडनच्या घरात’ हे त्यातले काही गाजलेले चित्रपट.१९८५ साली आलेल्या धुमधडाका या चित्रपटातली त्यांची अंबाक्काची भूमिका आणि दे दणादण या चित्रपटातील जाऊया डबल सीट हे गाणं विशेष गाजलं. अभिनयाखेरीज त्यांनी उतावळा नवरा या चित्रपटाची निर्मितीही केली होती. या चित्रपटाने तिकीट काउंटरवर चांगली कमाई केली होती.
२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गाव थोर पुढारी चोर’ या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिगंबर नाईक आणि किशोर नांदलस्कर मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ‘फ्रेंडशिप बँड’ आणि ‘एए बीबी केके’ या चित्रपटातदेखील त्यांनी भूमिका साकारली होती. फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम करत महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
प्रेमा किरण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नव्या कलाकारांना मालिकांचे पैसे तीन महिन्यांपर्यंत मिळत नाहीत. तसंच पडद्यामागील कलाकारांनाही कोणी वाली नाही. त्यांच्यासाठी राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचं ठरविल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलं होतं.