मुंबई,दि.६ मार्च २०२३ – ज्येष्ठ क्रिडा पत्रकार,समालोचक वि.वि.करमरकर यांचे आज सकाळी मुंबईत निधन झालं ते ८५ वर्षांचे होते. क्रीडा पत्रकारितेचा एन्सायक्लोपीडिया, तरुण क्रीडा पत्रकार आणि खेळाडूंचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मराठी वृत्तपत्रात सर्वात पहिल्यांदा क्रीडा पान सुरू करणारे आणि क्रीडा पानाचे जनक अशी त्यांची ओळख होती.
विष्णू विश्वनाथ करमरकर यांचा जन्म नाशिक येथे ११ ऑगस्ट १९३८ रोजी झाला त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्येच झाले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. झाले.करमरकरांचे वडील डॉ. वि.अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर होते आई सुशीलाताई यांनी करमरकरांना संस्कारित केले. रत्ना थोरात व माणिक मराठे या त्यांच्या भगिनी.विष्णू विश्वनाथ करमरकर यांनी पत्रकारितेची सुरुवात पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक आणि मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते एस.एम. जोशी चालवत असलेल्या दैनिक लोकमित्र मधून केली. जून १९६२मध्ये करमरकर महाराष्ट्र टाइम्सच्या क्रीडा विभागाचे प्रमुख झाले. सहसंपादक (क्रीडा) या नात्याने ते महाराष्ट्र टाइम्समधील क्रीडा पानावे संपादन करू लागले. त्यांची ही पत्रकारिता खेळाच्या बातम्या, क्रीडासमीक्षणे व स्तंभलेखन यांविषयी मराठी माणसाची जिज्ञासा पुरी करू लागली. आणि याचा परिणाम म्हणून सर्वच मराठी वृत्तपत्रांत हळूहळू क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.
वर्तमानपत्रातून दैनंदिन क्रीडा समीक्षा लेखन करणारे वि.वि.करमरकर यांचे स्तंभलेखन वाचकांना आवडू लागले. भारतीय खेळाडू हे जगातील जमेका, क्यूबासारख्या अगदी छोट्या छोट्या देशांतील खेळाडूंपेक्षा किती अधिक मागासलेले आहेत हे करमरकरांनी वाचकांच्या नजरेस आणले. जगातील अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्यक तज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवांचे करमरकरांनी शब्दांकन करून प्रसिद्ध केले.
करमरकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे क्रीडा बातम्यांना संपूर्ण पान मिळाले. मराठी दैनिकात पहिल्यांदाच क्रीडा बातम्यांना संपूर्ण पान देण्याचा प्रयोग त्यांनी राबवला आणि त्याला प्रतिसादही मिळाला. खेळ, खेळाडू, संस्था, क्रीडा संघटक यांचे प्रयत्न यामाध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले.
वि.वि.करमरकर यांच्या निधनाने क्रीडा पत्रकारितेचा नायक हरपला -छगन भुजबळ
ज्येष्ठ पत्रकार क्रीडा पानाचे जनक अशी ओळख असलेले वि.वि.करमरकर यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रीडा पत्रकारितेत अतुलीनीय योगदान देणारा नायक हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.
छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, मुळचे नाशिकचे असलेले वि.वि.करमरकर यांनी नाशिकमध्ये आपले उच्चशिक्षण पूर्ण करत नाशिक शहरातून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांनी मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू केली. देशी, विदेशी खेळांना मानाचे पान त्यांनी दिल. त्यामुळे क्रीडा पानाचे जनक अशी ओळख त्यांना मिळाली. सामाजवादी विचारांच्या जडणघडणीत तयार झालेल्या करमरकर यांनी आपल्या उभ्या आयुष्यात सतत पारदर्शक कारभाराचा अट्टहास धरला. क्रिकेटसोबत खोखो, कबड्डी, कुस्ती या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय करण्यात त्या त्या संस्थांसह करमरकर यांच्या मार्गदर्शक लेखणीचा खूप मोठा वाटा आहे. करमरकर यांच्या लेखणीला धार होती. खेळ आणि खेळाडूंच्या पलीकडची बातमी वाचकांसमोर ठेवताना त्यांनी एक मोठा कॅनव्हास उभा केला. त्यांच्या लेखणी मुळे खेळांचा प्रचार प्रसार होत राहिला.
त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रातील संवेदनशील लेखक, समीक्षक काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय करमरकर कुटुंबियांच्या दुखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.