विदुषी सानिया पाटणकर यांचे सूर विश्वासमध्ये रविवारी गायन

0

नाशिक,दि, ११ एप्रिल २०२३ – नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’ या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 16 एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७:०० वाजता विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन होणार आहे. आदित्य कुलकर्णी (तबला), दिव्या रानडे (संवादिनी) यांची त्यांना साथसंगत लाभणार आहे. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे या करणार आहेत.

मैफिलीचे हे पंचविसावे पुष्प असून विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून संकल्पना विनायक रानडे यांची आहे. क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. उदयोन्मुख कलावंताच्या प्रयोगशीलेचा अविष्कार रसिकांना दर महिन्याला अनुभवण्यास मिळत आहे.

सानिया यांना वयाच्या ६ व्या वर्षी गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्याकडून आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले आणि श्रीमती लीलाताई घारपुरे (श्रीमती हिराबाई बडोदेकर यांच्या ज्येष्ठ शिष्या) यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या 12व्या वर्षी पं.जितेंद्र अभिषेकी यांच्यासमोर सानिया यांनी गाणे सादर केले आणि प्रेक्षकांनी त्यांना दाद दिली. प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे (जयपूर-अत्रौली घराणे) यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याचा बहुमान सानिया यांना मिळाला. त्यांनी अश्विनीजींच्या मार्गदर्शनाखाली 12 वर्षे सर्वसमावेशक घराणा तालीमचे प्रशिक्षण घेतले.

सानिया या संगीत विशारद आहेत आणि एम.कॉम. मध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. कंपनी सचिव अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. त्यांची मेहनत, चिकाटी आणि संगीतावरील प्रेम यामुळे संगीत आणि शैक्षणिक अशा दोन्ही आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध करण्यात मदत झाली. याशिवाय सानिया यांना संगीततज्ज्ञ, संगीत समीक्षक आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे दिग्गज पं. भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर, स्वर्गीय पं. श्रीमती हिराबाई बडोदेकर, पंडित जसराज, उस्ताद अली अकबर खान, उस्ताद सईदुद्दीन डागर, पं. श्रीमती. गंगुबाई हनगल, पं. श्रीमती. प्रभा अत्रे, दिवंगत पं. जितेंद्र अभिषेकी, बेगम परवीन सुलताना, श्रीमती मालिनी राजूरकर, पं. अजय चक्रवर्ती, पं. विश्वमोहन भट आणि इतर अनेकांचे आशीर्वाद लाभले आहेत.

सदर कार्यक्रम विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा जलालपूर, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी, ऑडियो पार्टनर दि ऑर्क ऑडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर, ऋचिता ठाकूर व विनायक रानडे यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.