मुंबई,दि.१० मे २०२५ – भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नामवंत मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड(Vikram Gaikwad) यांचे आज मुंबईत निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. काशीनाथ घाणेकर, बालगंधर्व, ठग्ज ऑफ हिंदुस्तान, शहीद भगतसिंग, जाणता राजा अशा अनेक ऐतिहासिक व चरित्रप्रधान कलाकृतींना त्यांनी आपल्या कुशल मेकअप कौशल्यातून अजरामर केले. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ४:३० वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विक्रम गायकवाड (Vikram Gaikwad)यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली असून,अनेक कलाकार व दिग्दर्शकांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
लहान वयातच सुरु झालेली मेकअपची मोहिमा
अभिनेते अशोक शिंदे यांचे वडील, बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम गायकवाड यांनी मेकअपची कला आत्मसात केली. सातवीत शिकत असतानाच त्यांनी चिमणी, गाढव, मोर, पोपट यांसारख्या प्राण्यांचा मेकअप करत शाळांतील स्नेहसंमेलने सजवली. पुण्यातील विविध मुलींच्या शाळांमध्ये मेकअप करण्याचा अनुभव त्यांनी स्वतः सांगितला होता. पुढे त्यांनी एकांकिका, लोकनृत्य, संगीत नाटकांमधून प्रचंड अनुभव मिळवला. दहावीत असतानाच त्यांनी दिग्गज कलाकारांना रंगमंचावर साकारण्यात हातभार लावला.
‘सरदार’पासून ‘८३’पर्यंतचा गौरवशाली प्रवास
त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ‘सरदार’ या चित्रपटातून झाली होती. परेश रावल यांना सरदार वल्लभभाई पटेलसारखे दाखवण्यासाठी त्यांनी साकारलेला मेकअप विशेष गाजला. पुढे ‘मेकिंग ऑफ महात्मा’, ‘बालगंधर्व’, ‘संजू’, ‘८३’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी अभूतपूर्व कामगिरी केली.
“मी कलाकारांचा नव्हे, तर देवांचा मेकअप करतो”
गायकवाड यांनी एकदा म्हटले होते, “माझ्यासमोर कोणी कलाकार नसतो, तर साक्षात देव असतो. आणि त्या देवाची मी पूजा करत असतो.” हीच श्रद्धा त्यांच्या कामात झळकत होती. प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत करण्यामागे त्यांची ही भावना आणि तितकाच कौशल्यपूर्ण हात होता.